‘त्या’३४ जुगा-यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 29, 2014 00:13 IST2014-10-29T00:13:26+5:302014-10-29T00:13:26+5:30
मलकापूर येथील प्रतिष्ठितांचा समावेश.

‘त्या’३४ जुगा-यांवर गुन्हा दाखल
खामगाव (बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्गावर पिकनिक हॉटेल जवळ सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर काल २७ ऑक्टोबरला उपविभागीय पोलिस अधीकारी जी. श्रीधर यांच्या पथकाने छापा मारुन जुगार्यांना ताब्यात घेतले होते. तर कालच रात्री या ३२ जुगार्यांवर मलकापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये राजकीय पदाधिकार्यांसह कर्मचार्यांचासुद्धा समावेश आहे.
मलकापूर शहरानजीक हॉटेल पिकनिकचे बाजूला असलेल्या बंद खोलीमध्ये खुलेआमपणे जुगाराचा अड्डा असल्याची माहिती खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर यांना मिळाली होती. त्याआधारे उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या पथकाने काल २७ ऑक्टोबर रोजी रात्री या जुगाराच्या अड्डय़ावर छापा मारला असता ३४ जण जुगार खेळताना आढळून आले होते. या जुगार्यांकडून पथकाने नगदी १ लाख १५ हजार ४९0 रुपये, १३ दुचाकी, इंडिका व स्वीफ्ट डिझायनर अशा दोन कार असा एकूण ८ लाख ७८ हजार ४९0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता; तसेच जुगार खेळणार्या ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी रात्री मलकापूर पो.स्टे.ला या ३४ जुगार्यांविरुद्ध कलम ४ व ५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्ष दिलीप त्र्यंबकराव देशमुख, नगरसेवक प्रमोद विश्वनाथ अवसरमोल, शंकर विष्णू वाघ, रितेश कैलास वाघ, हरिदास तुकाराम पाटील यांच्यासह ३२ आरोपींचा समावेश आहे.