शिक्षकांविरुद्ध महिला कर्मचा-याची तक्रार
By Admin | Updated: November 22, 2014 01:15 IST2014-11-22T01:15:42+5:302014-11-22T01:15:42+5:30
शेगाव येथील प्रकार; मुलींच्या शासकीय वसतिगृहात चौकशी समिती दाखल.

शिक्षकांविरुद्ध महिला कर्मचा-याची तक्रार
शेगाव (बुलडाणा): विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या निकृष्ट दर्जाच्या जेवणातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले शेगाव येथील शासकीय मुलींचे वसतिगृह व निवासी शाळा आता शिक्षिकेच्या एका गंभीर स्वरूपाच्या तक्रारीने पुन्हा चव्हाट्यावर येत आहे. ही तक्रार पुरुष शिक्षकांच्या संबंधित असल्याने आज समाज कल्याण अधिकार्यांच्या नेतृत्वात चौकशी समिती शेगावात दाखल होऊन कर्मचार्यांचे जबाब घेण्यात आले.
शेगाव शहराबाहेर शासकीय मुलींचे वसतिगृह व निवासी शाळा असून, या शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेमध्ये मागील काही दिवसांपासून वाद-विवाद सुरू आहे. यातील राठोड नामक शिक्षिकेने येथील काही शिक्षकांविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. याबाबत आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार त्यांनी समाज कल्याण विभागाकडे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर शिक्षिकेने दोन दिवसांपूर्वी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबतचे प्रकरण पो.स्टे.पर्यंंत पोहचविले होते. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन ढगे यांच्यासह महिला व बाल कल्याण अधिकारी व संबंधित अधिकार्यांनी शेगाव येथे येऊन चौकशी सुरू केली. यामध्ये शिक्षक, कर्मचार्यांसह विद्यार्थिनींचेही जबाब नोंदविल्याची माहिती आहे. मुलींचे वसतिगृह असताना या वसतिगृहात पुरुष शिक्षक हे मुक्कामी राहतात, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
समाज कल्याण अधिकारी नितीन ढगे यांनी सदर प्रकरणी नि:पक्ष चौकशी सुरू असून, यामध्ये तथ्य आढळल्यास थेट पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.