मका पिकाची नुकसान भरपाई द्या!
By Admin | Updated: November 13, 2014 00:26 IST2014-11-13T00:26:27+5:302014-11-13T00:26:27+5:30
बुलडाणा जिल्हा ग्राहक मंचचे आदेश.

मका पिकाची नुकसान भरपाई द्या!
बुलडाणा : कृषी केंद्रातून खरेदी केलेली मका पिकांच्या बियाण्यास फलधारणा झाली नाही. त्यामुळे उबाळखेड येथील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना बियाणे कंपनी व दुकानदार यांनी नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक मंच यांनी १0 नोव्हेंबर रोजी दिले.
या आधारे उबाळखेड येथील प्रदीप चव्हाण, राजू भुसारी, अशोक उबाळे, दिलीप भुसारी या शेतकर्यांनी रोहिणखेड येथील एका कृषी केंद्र येथून मक्याचे बियाणे खरेदी केले होते. ते बियाणे पेरणी केल्यानंतर बियाण्यास फलधारणा झाली नाही. त्यामुळे कृषी अधिकारी तथा जिल्हा कृषी समितीने या पिकांची पाहणी करुन अहवाल दिला. अहवालामध्ये संबंधित शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. या आधारे उबाळखेड येथील या चारही शेतकर्यांनी अँड.ए.टी.मुळे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यावर कंपनी व दुकानदार यांची बाजू, कागदपत्र तसेच अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज व वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा ग्राहक मंचाने आदेश पारित केला.
यानुसार प्रदीप चव्हाण यांना २९ हजार, दिलीप भुसारी यांना ३५ हजार, उबाळे यांना २0 हजार आणि राजू भुसारी यांना २९ हजार रुपये नुकसान भरपाई ४५ दिवसात देण्याचे आदेश १0 नोव्हेंबर रोजी जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अँड.विवेक सोनुने यांनी दिला.