मोताळा तालुक्यात समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत बांबू लागवडीस प्रारंभ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:37+5:302021-08-20T04:40:37+5:30
धामणगाव बढे : सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत महाराष्ट्रातील सहभागी ३९ तालुक्यांतील गावांमध्ये स्वातंत्र्य दिनापासून बांबू लागवडीची मोहीम ...

मोताळा तालुक्यात समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत बांबू लागवडीस प्रारंभ;
धामणगाव बढे : सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत महाराष्ट्रातील सहभागी ३९ तालुक्यांतील गावांमध्ये स्वातंत्र्य दिनापासून बांबू लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून मोताळा तालुक्यातील सिंदखेड प्रजा या गावाने आपल्या शिवारात पाच हजार बांबू लागवडीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या मोहिमेस प्रारंभ केला आहे.
यामागील काही वर्षांपासून प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात सिंदखेड शिवारातील सुमारे तीस एकर माळरानामध्ये वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन पूर्ण झाले आहे. यावर्षी माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत सुद्धा सिंदखेड ग्रामपंचायतीने दहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले असून, त्यातील सुमारे अडीच हजार वृक्षांची लागवड आतापर्यंत करण्यात आलेली आहे. वृक्ष लागवडीसोबतच वृक्षसंवर्धन याकडे सातत्याने लक्ष दिले जात आहे. त्यांची योग्य वाढ झाली का? याची पाहणी करण्यात आली. यामध्ये स्वयंसाहाय्यता समूहातील महिला, गावातील तरुण, जलमित्र शेतकरी, गावकरी व ग्रामपंचायत संपूर्ण टीम सहभागी झाली होती. मोठ्या प्रमाणात श्रमदानासाठी गावकरी रोपे लागवडीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. वॉटर कपदरम्यान मोठ्या प्रमाणावर नाला खोलीकरण, रुंदीकरण, माती नाला बांध, सीसीटी, डीप सीसीटी शेततळे यांसारख्या जलसंधारणाच्या रचना गावाने श्रमदानाच्या मोहिमेतून निर्माण केल्या होत्या. त्याच्या काठांवर बांबूरोपे लागवड करण्यात आली. ही बांबू लागवड मोहीम पुढील आठवडाभर सातत्यपूर्ण सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने श्रमदानातून पूर्ण करण्यात येणार आहे.
असे आहेत बांबू लागवडीचे फायदे...
बांबूमुळे मृदा व जलसंधारण खूप चांगल्या प्रकारे होते. शिवाय नालाकाठावर बांबू लागवड केल्यास नाला खोलीकरणदरम्यान नालाकाठावर टाकलेली माती घट्ट पकडून ठेवण्यास बांबूच्या मुळांद्वारे मदत होते. त्याचबरोबर पाच वर्षांनंतर बांबूपासून उत्पन्नाला प्रारंभ होतो.
या उपक्रमासाठी गावातील जलमित्र, उमेद अभियानातील महिला, ग्रामपंचायत संपूर्ण टीम व संपूर्ण ग्रामस्थांनी मेहनत घेतली. मोताळा तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीने दोन हजार बांबू रोपांची यशस्वी लागवड पूर्ण केली असून, उबाळखेड, दाभा, चिंचखेड नाथ, महाळुंगी जहागीर, तिग्रा, शिलापूर खुर्द, या गावांमध्ये सुद्धा बांबू लागवड सुरू आहे.