बुलडाण्याचा स्वप्नील झाला जिल्हाधिकारी!
By Admin | Updated: May 11, 2016 02:44 IST2016-05-11T02:44:15+5:302016-05-11T02:44:15+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल; आयपीएससाठीही झाली होती निवड.

बुलडाण्याचा स्वप्नील झाला जिल्हाधिकारी!
राजेश शेगोकार / बुलडाणा
एक ध्येय प्राप्त झाले तर हातावर हात देऊन थांबणारी आजची पिढी नाही, रोज नवीन आव्हाने व रोजच नवीन विक्रम करण्याकडे कल असणार्या आजच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून बुलडाण्याच्या स्वप्नील दिनकर पुंडकर या युवकाचे नाव घ्यावे लागेल. अभियांत्रिकी क्षेत्रातील चांगली नोकरी सोडून स्पर्धा परीक्षांच्या नादी लागलेल्या या युवकाने आयपीएस ही परीक्षा गेल्याच वर्षी उत्तीर्ण केली अन् मंगळवारी आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण होत आता जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळविला आहे.
बुलडाणा येथील डॉ.दिनकर पुंडकर व खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लॅब टेक्निशियन असलेल्या भावनांजली पुंडकर यांचा स्वप्नील हा मुलगा. त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत देशभरातून ४८७ वा क्रमांक मिळविला आहे. आता त्याची जिल्हाधिकारी म्हणून निवड होणार आहे. स्वप्नील हा बुलडाण्यातील सेंट जोसेफ या शाळेचा विद्यार्थी. बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या स्वप्नीलचा कल अभियांत्रिकी शाखेकडे होता, त्यामुळे गुवाहाटी येथील आयआयटीमध्ये त्याने प्रवेश केला.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर स्वप्नीलला बंगलोर येथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी लागली. तब्बल चार वर्षे नोकरी करीत असताना त्याला प्रशासकीय सेवा खुणावत होती. अखेर आई-वडिलांसोबत चर्चा करून त्याने नोकरीचा राजीनामा देत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली. दिवसरात्र अभ्यास करत स्वप्नीलने गेल्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयपीएस ही परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादन केले.