ढगफुटीचा मेहकर तालुक्यातील तीन गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:42+5:302021-06-30T04:22:42+5:30

मेहकर : चिखली तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे आमखेड पाझर तलाव फुटल्याने त्याचा फटका मेहकर तालुक्यातील तीन गावांना बसला असून ...

Clouds hit three villages in Mehkar taluka | ढगफुटीचा मेहकर तालुक्यातील तीन गावांना फटका

ढगफुटीचा मेहकर तालुक्यातील तीन गावांना फटका

मेहकर : चिखली तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे आमखेड पाझर तलाव फुटल्याने त्याचा फटका मेहकर तालुक्यातील तीन गावांना बसला असून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या नुकसानीची मंगळवारी आ. संजय रायमुलकर यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांना धीर दिला.

चिखली तालुक्यात २८ जूनला झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने आमखेड आणि अंबाशी येथील पाझर तलाव फुटले. त्यामुळे मेहकर तालुक्यातील हिवरखेड, माळखेड आणि वर्दडा या गावांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली, विहिरी बुजल्या, विजेचे खांब पडले. या भागाची व पाझर तलावाची मंगळवारी आ. संजय रायमुलकर व तहसीलदार डॉ. संजय गरकल, गटविकास अधिकारी आशीष पवार, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे यांनी पाहणी केली. यावेळी चिखली तहसीलदार अजितकुमार येळे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, उपजिल्हा प्रमुख शिवाजी देशमुख उपस्थित होते. यावेळी आ. संजय रायमुलकर यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तुमच्यासोबत शासन आहे. घाबरून जाऊ नका. मदत मिळण्यासाठी मी व खा. प्रतापराव जाधव सर्व प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले.

शेतात पाणीच पाणी

शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाल्याने शेती की नदी असे दृश्य सोमवारी सर्वत्र दिसत होते. आमखेड येथील पाझर तलाव १९७१ सालातील जुना आहे. त्याची दरवर्षी दुरुस्ती होते का? या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ.संजय रायमुलकर यांनी केली आहे. या नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करा असे निर्देश आ.संजय रायमुलकर यांनी महसूल विभागाला दिले आहेत़

चाैकशीची मागणी

आमखेड व अंबाशी तलाव फुटून नुकसान झालेल्या भागाचा तात्काळ सर्व्हे करून अहवाल पाठवा व या घटनेची तात्काळ चौकशी करा असे निर्देश खा. प्रतापराव जाधव यांनीसुध्दा दिले आहेत. साेमवारच्या पावसामुळे मेहकर शहरासह ११ खेड्यांची तहान भागविणारा कोराडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

१८८ हेक्टवरील पिकांचे नुकसान

मेहकर तालुक्यातील हिवरखेड येथील ९० शेतकरी यांचे १५० हेक्टर, माळखेड येथील १५ शेतकरी यांचे २० हेक्टर, वरदडा येथील १० शेतकऱ्यांचे १८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़

Web Title: Clouds hit three villages in Mehkar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.