सराफा व्यावसायिकांचा बंद
By Admin | Updated: March 3, 2016 02:16 IST2016-03-03T02:16:35+5:302016-03-03T02:16:35+5:30
खामगाव येथे सुवर्णकारांचे उत्पादन शुल्क विरोधात आंदोलन.

सराफा व्यावसायिकांचा बंद
खामगाव : सोने-चांदीच्या दागिन्यांवर एक्साईज ड्युटी लागू केल्याच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्हा सराफ व सुवर्णकारांच्या वतीने २ मार्चपासून कडकडीत बेमुदत बंद पाळण्यात येत आहे. या आंदोलनांतर्गत पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सराफांची सुमारे ६00 दुकाने दिवसभर बंद होती. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सन २0१६-१७ च्या अर्थसंकल्पात सोने वा चांदीच्या दागिन्यांवर एक टक्का एक्साईज ड्युटी लागू करण्याचा प्रस्ताव केला आहे. या कायद्याच्या कचाट्यात लहानात लहान व्यापारी व सुवर्णकार ओढल्या जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार असून, इन्स्पेक्टरराज वाढणार आहे. हा कायदा सर्व व्यवसायिकांसाठी जाचक ठरणार आहे. यामुळे व्यवसाय करणे अवघड होणार आहे. व्यावसायिकांना व्यवसाय सोडून मुनीमजी बनवणारा हा कायदा असल्याने महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने राज्यभरातील सर्व सराफ व सुवर्णकार यांचा बेमुदत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलडाणा जिल्हा, सराफ व सुवर्णकार संघाने या बेमुदत बंदमध्ये सहभागी होत बेमुदत बंदचे आवाहन अध्यक्ष मनोजभाई शहा व सचिव प्रेमचंद झांबड यांनी केले आहे.