लिपिक,शिपाईपदाचा पेपर फुटला!
By Admin | Updated: April 12, 2017 01:04 IST2017-04-12T01:04:14+5:302017-04-12T01:04:14+5:30
बाजार समिती पदभरती प्रक्रिया : परीक्षार्थींसह स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा आरोप!

लिपिक,शिपाईपदाचा पेपर फुटला!
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिपिक व शिपाई पदासाठी ९ एप्रिल रोजी पेपर घेण्यात आला होता; परंतु या भरती प्रक्रियेच्या सर्व प्रश्न पत्रिकेवर वेळ, गुण, एकूण प्रश्न यात पेनद्वारे खाडाखोड करण्यात आली असल्याने पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांसह स्वाभिमानीने केला असून, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवार व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी १० एप्रिल रोजी केली आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिपिक व शिपाई पदासाठी ९ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. भरती प्रक्रिया बाजार समिती व टेडरधारक कंपणीच्या माध्यमातून घेण्यात आली; परंतु सदर भरती प्रकियेदरम्यान केंद्र क्रमांक ३ वरील खोली क्रमांक ९ मध्ये शिपाई पदाच्या सर्व प्रश्न पत्रिकेवर वेळ, गुण, एकूण प्रश्न यावर पेनद्वारे खाडाखोड केल्याचे दिसून आल्याने या खोलीत गोंधळ झाला होता, तसेच उमेदवारांनी पेपर १५ मिनिट बंददेखील केला होता. यासंदर्भात विचारणा केली असता, लेखी तक्रार करा, आम्ही पेपर सेल तुमच्यासमोर फोडले आहे. यात आमचा काही संबंध नसल्याचे केंद्र प्रमुखांनी सांगितले, तसेच यासंदर्भात लेखी तक्रार करण्यास सांगितल्याने पेपर सुरू करण्यात आला होता; परंतु परीक्षार्थी उमेदवारांसमोर प्रश्नपत्रिकेचा सील तोडण्यात आला असला, तरी आतील सर्व प्रश्न पत्रिकेवर पेनद्वारे वेळ, एकूण गुण, एकूण प्रश्न यात खाडाखोड करण्यात आली असल्याने प्रश्नपत्रिका चाळण्यात आल्याचे स्पष्ट होते.
तसेच लिपिक पदाच्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्न क्रमांक खोडून स्केच पेनने बदललेले आहे. याचा अर्थ सीलपॅक प्रश्न पत्रिका पाकिट फोडून परत पॅक केल्याचे निष्पन्न होत असल्याने तसेच प्रश्नपत्रिकेवर खाडाखोड करणे नियमाने गुन्हा आहे, तरी यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी व प्रामाणिक व गरीब कुटुंबातील व हुशार विद्यार्थी उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता सदर पदाच्या जागेसाठी नव्याने पारदर्शकपणे भरती प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवारांसह स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे सचिव, पणन व कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे; तसेच आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांच्याशी चर्चा करण्यात येऊन याप्रकरणी योग्य कारवाई करून उमेदवारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानीचे नितीन राजपूत, विनायक सरनाईक, दीपक सुरडकर, भरत जोगदंडे, गोपाल ढोरे पाटील, विलास तायडे, गजानन भणगे, सतीश देशमाने, प्रवीण साळवे यांच्यासह परीक्षार्थी उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे.