ग्रामस्थांचा गटविकास अधिका-यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 23:54 IST2015-09-17T23:54:37+5:302015-09-17T23:54:37+5:30
संग्रामपूर गावात आर.ओ प्लांट बसविण्याची मागणी.

ग्रामस्थांचा गटविकास अधिका-यांना घेराव
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : गावातील विविध समस्यांसाठी संग्रामपूर तालुक्यातील झाशी येथील नागरिकांनी सोमवारी दुपारी गटविकास अधिकार्यांना घेराव घातला. गावातील समस्यांकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने यावेळी ग्रामस्थांनी कमालीचा संताप व्यक्त केला. तालुक्यातील झाशी या गावाचा समावेश धामणगाव गोतमारे या ग्रामपंचायतीत होतो. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे. दरम्यान, गावात पिण्याच्या पाण्याकरिता हापशी तसेच ग्रामपंचायतने अधिग्रहीत केलेले बोअरवेल आहे. परंतु यामध्ये क्षारयुक्त पाणी पुरवठा गावात होते व त्यामुळे गावातील बरेच नागरिक किडनीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. मागील महिन्यात किडनीच्या आजाराने गावातील ४ लोकांचा मृत्यू झाला असून सद्यास्थितीतही बरेच किडनीचे रुग्ण आहेत. त्यामुळे गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, यासह गावातील विविध समस्या सोडविण्यात याव्यात,याबाबत ग्रामस्थांच्यावतीने वारंवार पाठ पुरावा करण्यात आला. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकरी बचाओ आंदोलन समितीच्यावतीने बीडीओंना घेराव घालण्यात आला. यामध्ये तालुका संघटक केशव घाटे, माजी सरपंच पुंजाजी जानराव जळमकार, सुनंदा पुंजाजी जळमकार, ग्रा.पं.सदस्या, वसंत नामदेव जळमकार, विलास देविदास चव्हाण, यांच्यासह गावातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. याप्रसंगी पं.स.गट विकास अधिकारी डॉ.हिरोळे, पं.स.सदस्य लोकेश राठी, विस्तार अधिकारी भिलावेकर, आरोग्य विस्तार अधिकारी राठोड यांनी नागरिकांच्या समस्यांचे समाधान केले. यावेळी गटविकास अधिकारी तसेच पाणी पुरवठाच्या अधिकार्यांनी गावात येवून पाहणी करुन योग्य ती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही गटविकास अधिकार्यांना सादर करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार बी.आर.गिते यांनी प्रशासकीय कार्यालयात उपस्थिती लावली होती.