विजयाचा दावा सर्वांचाच; टक्केवारी वाढली
By Admin | Updated: October 17, 2014 00:13 IST2014-10-17T00:06:22+5:302014-10-17T00:13:41+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मतदानाची आकडेमोड व गणिते रंगलीत.

विजयाचा दावा सर्वांचाच; टक्केवारी वाढली
बुलडाणा : मतदान संपल्यानंतर रात्री उशिरा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली असून, नवमतदारांनी मतदानाचा हक्क उत्साहात बजावल्याचे दिसून आले. या पृष्ठभूमिवर आता राजकीय क्षेत्रात आकड्यांची गृहिते पकडून गणिते मांडली जात आहेत. वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्थ्यावर पडणार, हे रविवार १९ ऑक्टोबरला समोर येणार असले तरी या टक्केवारीच्या आधारे सर्वच उमेदवारांनी व त्यांच्या पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. आघाडी आणि महायुती दुभंगल्यानंतर १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसारखे चित्र समोर आले आहे. सर्वच मतदारसंघात सुरुवातीला असलेल्या बहुरंगी लढतीमध्ये म तदानाच्या दिवशी मात्र या सर्व लढती तिरंगी व दुरंगी झाल्या. यामुळे विजयाचे गणित लावणे सध्या कठीण आहे. काँग्रेसच्या गटामध्ये मतविभाजनाचे गणित मांडून उमेदवारांच्या विजयाची समीकरणं मांडली जात आहेत. भाजपला मोदी लाटेचा आधार अजूनही वाटत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस चिखली आणि सिंदखेडराजा मतदारसंघात प्रचंड आशावादी असून, इतर मतदारसंघांमध्येही आम्ही लढतीत आहोत, अशी भूमिका पक्षातून मांडली जात आहे.
*तीन निवडणुकांमधील सर्वाधिक मतदान
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात २00४, २00९ व २0१४ यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक ६६.४0 टक्के मतदान यावर्षी झाले आहे. २00४ मध्ये सातही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ५३.१७ एवढी होती. २00९ मध्ये ६६.१६ टक्के मतदान झाले होते. तीन निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे.