स्वच्छ सर्वेक्षण-२०२० ला नागरिकांच्या अभिप्रायाचा अडथळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:24 IST2020-01-31T14:24:22+5:302020-01-31T14:24:27+5:30
अभिप्रायात नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद ही राज्यातील पालिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० ला नागरिकांच्या अभिप्रायाचा अडथळा!
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्वच्छता आणि जनजागृतीसाठी महत्वाकांक्षी असलेली ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ स्पर्धा नागरिकांच्या अभिप्रायाच्या अडथळ्यात अडकल्याचे चित्र आहे. अभिप्रायात नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद ही राज्यातील पालिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, सकारात्मक प्रतिसाद वाढविण्यासाठी पालिकांमधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून राज्यातील विविध पालिकां कर्मचाऱ्यांची स्वच्छ सर्वेक्षणासाठी धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते.
केंद्र शासनाने देशात स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांच्या अभिप्रायासाठी स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत ‘स्वच्छता अॅप’ हा पर्याय नागरिकांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे स्वच्छता मोहिमेत लोकसहभाग वाढला. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनीसुद्धा ही जबाबदारी घ्यावी.
नागरिकांना शहरात कुठेही अस्वच्छता, कचरा, घाण दिसली तर नागरिकांनी त्यांच्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून त्याचे छायाचित्र काढून ‘स्वच्छता अॅप’ वर ठिकाणासह टाकायचे.
जेणेकरून नगरपालिका त्यावर कारवाई करू शकेल आणि त्यातून शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. हा प्रमुख उद्देश त्यामागे होता. मात्र, स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मधील सिटीझन फिडबॅक (नागरिकांचा अभिप्राय) याघटकातंर्गत कामगिरीत राज्यातील नगर पालिकांची सुमार कामगिरी राहील्याचे दिसून येते.