बुलडाणा : मिरची आणि टोमॅटोचे उत्पादन वाढल्याने दरात विक्री घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या १० ते १५ रुपये प्रतिक्रिलो टोमॅटोची विक्री होत असल्याने बाजारामध्ये पुन्हा टाेमॅटाेचा लाल चिखल पाहावयास मिळत आहे; तर मिरचीचा प्रतिकिलोचा भाव १० रुपयांवर आल्याने ग्राहकांसाठी तिखट मिरची आता गोड झाली आहे. मागील वर्षी मिरची, टोमॅटोचे भाव चांगलेच वाढले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो हे भाजीपालवर्गीय पीक घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय थंडावले होते. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता सर्वच व्यवहारांत नुकसान सहन करावे लागले. त्यामध्ये भाजीपाला विक्री चांगली सुरू होती. परिणामी अनेकजण भाजीपाला व्यवसायाकडे वळले. शेतकऱ्यांनीही भाजीपालावर्गीय पिके घेण्याला पसंती दिली. मागील वर्षी टोमॅटोला चांगले भाव मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी मे ते जूनमध्ये टोमॅटो लागवड केली होती. सध्या बाजारात टोमॅटोची आवक वाढली असून, टोमॅटोला भाव मात्र पाहिजे तसा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. मिरचीचा भावही चांगलाच पडला आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली; आता भाजीपाला....
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने एका युवकाने गावाकडे येऊन भाजीपाल्याची शेती केली; परंतु भाजीपाल्याची आवक वाढल्याने आता भाजीपालाही घेणे परवडत नसल्याची खंत एका युवकाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.
नाशिकचे पडसाद बुलडाण्यात
बाजारामध्ये टोमॅटोला १५ ते २० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत असला, तरी शेतकऱ्यांकडून खरेदी करताना टोमॅटोला चार ते पाच रुपयेच भाव दिला जात आहे. नाशिकमध्ये गुरुवारी शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अगदी एक रुपया किलोचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले होते. त्याचे पडसाद आता इतर ठिकाणीही दिसून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातही शेतकऱ्यांकडील टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याचे दिसून आले.
आवक वाढल्याचा परिणाम
सध्या टाेमॅटो आणि मिरचीची आवक वाढल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. टोमॅटोला १० रुपयांपासूनच प्रतिक्रिलोचा भाव मिळत आहे. सायंकाळी तर टोमॅटो फेकून द्यावे लागत आहेत.
- शेख रशीद शेख हासन बागवान, भाजीपाला विक्रेते.
मिरची उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांचा तर लागलेले खर्चही भरून निघला नाही.
रमेश पांडव, मिरची विक्रेते.
प्रतिकिलोचे भाव
टोमॅटो १०-१५
मिरची १०