भिंत कोसळून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:22 IST2016-04-23T02:22:17+5:302016-04-23T02:22:17+5:30
वादळी वा-यामुळे कोसळली भिंत; दोन बालके जखमी.

भिंत कोसळून बालकाचा मृत्यू
बुलडाणा : अचानक आलेल्या वादळी वार्याने घराची भिंत पडून एका बालकाचा मृत्यू झाला, तर दोन बालके जखमी झाल्याची घटना मराठवाड्याच्या सीमेवरील सोयगाव तालुक्यातील नांदा गावात घडली. जखमी बालकांवर बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धामणगाव बढेपासून जवळच असलेल्या ग्राम नांदा तालुक सोयगाव येथील विनोद चव्हाण यांच्या घराच्या अंगणात सहा वर्षांची त्यांची मुलगी सपना आणि तीन वर्षांचा मुलगा शुभम खेळत होते, तर १२ दिवसांचे बालक झोक्यात झोपलेले होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १ वाजता अचानक जोरदार वादळी वारा सुटला. यात विनोद चव्हाण यांच्या घरावरचे छत जोरदार हवेने उडून गेले. तर घराची भिंत पडून भिंतीखाली तीनही बालके दबली. त्यांना तत्काळ देऊळगाव गुजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर १२ दिवसांच्या छोट्या बाळाला मृत घोषित केले. दोघा बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.