चिखली तालुक्याने पार केला गाळ उत्खनाचा मॅजीक फिगर!
By Admin | Updated: June 17, 2016 02:02 IST2016-06-17T02:02:59+5:302016-06-17T02:02:59+5:30
लोकसहभागातून काढला १६ लाख ६१ हजार घनमिटर गाळ; ३ हजार ३२२ हेक्टरावर सिंचनाची सोय.

चिखली तालुक्याने पार केला गाळ उत्खनाचा मॅजीक फिगर!
सुधिर चेके पाटील / चिखली (बुलडाणा)
सतत पडणारा दुष्काळ तसेच पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी चिखलीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांना तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या मोहिमेत मोठा सहभाग दिल्याने यंदा तालुक्यातील विविध गावांतील ४६ उपसा, पाझर तसेच अन्य लहान-मोठय़ा जलाशयांतून तब्बल १६ लाख ६१ हजार ५२0 घनमीटर गाळ काढण्यात यश आले असून, गाळ उत्खननासाठी प्रशासनाने निर्धारित केलेला पाच लाख ब्रासचा ह्यमॅजिक फिगरह्ण ओलांडल्याने जलाशयांनी मोकळा श्वास घेतला आहे.
गेल्या चार वर्षांंपासून होणार्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील सर्वच लहान-मोठे तलाव कोरडे पडले आहेत. त्यातच भूजल पातळी कमालीची खालावली असून, वाढत्या तापमानामुळे सद्य:स्थितीत केवळ सहा टक्के जलसाठा शिल्लक आहे. दुष्काळाची ही स्थिती पाहून हवालदिल होण्यापेक्षा दुष्काळाला इष्टापत्ती समजून गतवर्षाप्रमाणे यावर्षीही गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. सबंध राज्याचे लक्ष वेधले जाईल एवढय़ा प्रमाणात गाळ यावर्षी काढण्याचे नियोजन तालुकास्तरावर तहसीलदार विजय लोखंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यानुषंगाने तहसीलदारांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात मंडळनिहाय समित्यांचे गठन करून त्यांच्यावर आपल्या भागातील जलाशयांतील गाळ काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तहसीलदार विजय लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित मुख्य समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांचा समावेश असून, या समितीच्या नियंत्रणाखाली चिखली, अमडापूर, उंद्री, एकलारा, कोलारा, मेरा, हातणी, धोडप, पेठ, शेलगाव, चांधई या महसूल मंडळनिहाय समित्यांचे गठन करण्यात आले. या मंडळ स्तरावरील समित्यांचे अध्यक्ष महसूल मंडळ अधिकारी होते, तर सदस्यांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, कृषी मंडळ अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या मोहिमेंतर्गत यंदा पाच लाख ब्रास गाळ काढण्याचे लक्ष्य तहसीलदार लोखंडे यांनी ठेवले होते.