चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी देणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:04 IST2017-08-02T23:04:01+5:302017-08-02T23:04:57+5:30
चिखली : येथील शासनाकडून मंजूर उप जिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार राहुल बोंद्रे यांनी विधानसभेत २ आॅगस्ट रोजी निधीचा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले असता, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी तातडीने मंजूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे विशेष बाब म्हणून परवानगी घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने चिखली उप जिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी देणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : येथील शासनाकडून मंजूर उप जिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार राहुल बोंद्रे यांनी विधानसभेत २ आॅगस्ट रोजी निधीचा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले असता, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी तातडीने मंजूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे विशेष बाब म्हणून परवानगी घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने चिखली उप जिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
चिखली येथील उप जिल्हा रुग्णालय व या रुग्णालयावर मतदारसंघाबरोबरच मराठवाड्यातील मोठा परिसर, त्याचबरोबर सोलापूर-मलकापूर-खामगाव- जालना-बुलडाणा-वाशिम या महामार्गावरील चिखली उप जिल्हा रुग्णालयाचे स्थान लक्षात घेता येथे स्वतंत्र ट्रामा केअर सेंटर व्हावे, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून विधानसभेत आमदार राहुल बोंद्रे यांनी लावून धरली होती. परंतु, उप जिल्हा रुग्णालय मंजूर असतानाही निधीची तरतूद नसल्याने या रुग्णालयाचे काम रखडले होते. याकडे २ आॅगस्ट रोजी विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने उपस्थित करण्यात आलेल्या अर्धा तास चर्चेदरम्यान शासनाचे लक्ष वेधले. उप जिल्हा रुग्णालयाला मंजुरी प्राप्त होऊनही निधीअभावी पुढील काम रखडले असल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली.़ त्यावर स्पष्टीकरण देताना आरोग्य मंत्री ना. दीपक सावंत यांनी निधी तातडीने मंजूर व्हावा, यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडून परवानगी घेऊन निधी मंजूर केला जाईल, असे स्पष्ट केले़ आ.बोंद्रे यांनी तीर्थक्षेत्र सैलानी येथे श्रद्धेपोटी येणारे मनोरुग्ण यांचा प्रश्न उपस्थित करून, तेथे अद्ययावत मनोरुग्णालय उभारण्याची मागणी पूर्वीपासून असल्याचे सांगत, हे मनोरुग्णालय उभारण्यात येणार काय? असा प्रश्न विचारला असता, आरोग्य मंत्र्यांनी सैलानी या ठिकाणी असलेल्या उपलब्ध सुविधा पाहता तेथे मनोरुग्णालय उभारणे अवघड होईल, असे सांगून सैलानी हे तीर्थक्षेत्र चिखली मतदारसंघात येत असल्याने येथील उप जिल्हा रुग्णालयास जोडून मनोरुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश संबंधितांना दिला़ या चर्चेमुळे उपजिल्हा रूग्णालयासाठी निधी, उपजिल्हा रुग्णालयाला जोडून स्वतंत्र ट्रामा केअर सेंटर, असे प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.