चिखली पोलीस अॅक्शन मोडवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:11+5:302021-04-23T04:37:11+5:30
शहरात कोरोनाची स्थिती बघता कडक नियम लागू आहेत. तरी देखील काही भागात हॉटेलसह विविध दुकाने छुप्या पद्धतीने सुरू आहेत. ...

चिखली पोलीस अॅक्शन मोडवर !
शहरात कोरोनाची स्थिती बघता कडक नियम लागू आहेत. तरी देखील काही भागात हॉटेलसह विविध दुकाने छुप्या पद्धतीने सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ निर्धारित आहे. मात्र, या दुकानांत खरेदीसाठी झुंबड उडत असल्याने निर्बंधाचा फज्जा उडतो. याबाबत पालिका प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन नियमांचे पालन करण्याबाबत सांगूनही नागरिकांची बेफिकिरी कमी झालेली नाही. खरेदी व मुभा असलेल्या इतर बाबींचे कारण पुढे करीत नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे अखेरीस पोलीस प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागत आहेत. त्याअनुषंगाने ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात चिखली पोलिसांनी शहरात पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविले आहे. शहरात नियम धाब्यावर बसवून चालविण्यात येणाऱ्या दुकानांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तथापि विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद दिला जात असल्याने अखेरीस बेफिकीर नागरिकांवर जरब बसला असून पोलिसांच्या या 'अॅक्शन मोड'मुळे दुपारी १२ नंतर शहरातील रस्त्यांवर बऱ्यापैकी शुकशुकाट दिसून येत आहे. स्थानिक डी.पी.रोड या वर्दळीच्या ठिकाणी ठाणेदार वाघ यांनी पोलीस परेड घेण्यास सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना धडक कारवाईचे आदेश दिले. तसेच शहरात फिरून स्वत: पाहणी करीत आहेत.
पालिकेकडून दंडात्मक कारवाई !
शहरात नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी १९ एप्रिल रोजी महसूल, पोलीस व न.प.प्रशासनाने संयुक्तिकपणे शहरातील मुख्य रस्ते, बाजार परिसरात आपल्या फौज-फाट्यासह धडक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली. त्या पश्चात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने विनाकारण आणि विनामास्क फिरणारी गर्दी कमी झाल्याचे दृश्य आहे.
शहरात संचारबंदी लागू असल्याने अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाचे आदेश आहेत. तरीही काही नागरिक विविध कारणे पुढे करून घराबाहेर पडत असतात. त्यामुळे कठोर पावले उचलावी लागत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे, अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही.
गुलाबराव वाघ
ठाणेदार, चिखली.