वाढदिवसाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
By Admin | Updated: November 20, 2015 02:23 IST2015-11-20T02:23:19+5:302015-11-20T02:23:19+5:30
दुष्काळ मदतीसाठी चहाकर कुटुंबाचा उपक्रम.

वाढदिवसाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
मोताळा (जि. बुलडाणा): दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळत असताना फिजूल खर्चाला फाटा देत बोराखेडी येथील चहाकर कुटुंबाने आपल्या मुलाच्या वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दुष्काळामुळे महाराष्ट्रभर शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यासाठी अनेक संघटनांसह पदाधिकारी, सिनेस्टारसह राजकीय नेतेमंडळी मदत देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. बोराखेडी येथील रमेश व ज्योती चहाकर या कुटुंबानेसुद्धा आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता ११ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जमा करून पावती तहसील कार्यालयामध्ये सादर केली. चहाकर दाम्पत्यांच्या मुलाचा वाढदिवस २२ नोव्हेबर रोजी आहे. चहाकर कुटुंब नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहात आले आहे. यावेळी या कुटुंबाने मुलाच्या वाढदिवसाची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकर्यांना देण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक केल्या जात आहे. गुरुवारी जमा रकमेची पावती त्यांनी तहसील कार्यालयामध्ये सादर केली. यावेळी सरपंच सुरेश गर्दे, शे. साबीर शे. बशीर, राहुल तेलंग, शिवाजी चहाकर, गजानन तायडेसह पत्रकार मंडळी उपस्थित होती. *सहायता निधीसाठी मुख्यमंत्री रीलिफ फंड खाते क्रमांक-१0९७२४३३७५१ एसबीआय मुंबई मेन ब्रँच फोर्ट मुंबई ४00१. ब्रँच आयएफसी कोड एसबी आयएन-0000३00 असा आहे. ज्यांना मदत करावयाची आहे ते या खात्यामध्ये सरळ पैसे जमा करू शकतात.