दप्तरातील ओझे कमी करण्याचे आव्हान
By Admin | Updated: June 13, 2016 01:49 IST2016-06-13T01:49:20+5:302016-06-13T01:49:20+5:30
लगबग सुरू : २७ जून रोजी वाजणार शाळेची पहिली घंटा!

दप्तरातील ओझे कमी करण्याचे आव्हान
बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी २७ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर पुन्हा बालकांच्या पाठीवरील ओझे वाहण्याच्या नियमित प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बालकांच्या पाठीवरील हे ओझे कमी व्हावे, यासाठी शासनातर्फे विविध निर्णय घेण्यात आले, तशा सूचना संबंधित शाळेला देण्यात आल्या आहेत. मात्र हे ओझे अद्याप कमी झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांसमोर आता दप्तराचे ओझे कमी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शैक्षणिक वर्ष प्रारंभ होण्यापूर्वी शाळा या बाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हय़ात लवकरच शाळांना सुरुवात होत आहे. पहिलीतील मुलांच्या दप्तराचे ओझे दोन किलो आणि आठवीतील मुलांच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोग्रॅमपेक्षा जास्त असू नये, असे शासनाच्या शिक्षण विभागाच्या समितीने तयार केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. असे असले तरीही शाळेच्यावतीने कोणतेही नियोजन होत नसल्याने दरवर्षी हे ओझे बालकांना वाहावे लागत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशापेक्षा दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट वजन बालकांच्या पाठीवर आढळून येते. परिणामी कोवळ्या वयाच्या बालकांच्या पाठीच्या कण्यावर ताण पडत आहे. प्रमाणाबाहेर वजनदार दप्तरांमुळे मुलांना मानेच्या व पाठीच्या स्नायूचे विकार, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण येणे, यासारखे विकार होऊ शकतात. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १0 टक्के वजन दप्तराचे असावे, असे शासकीय अहवालात सुचवले आहे. शाळा सुरू होण्यापासूनच याची योग्य अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होण्यास मदत मिळेल. वह्या-पुस्तकांच्या वजनाचा परिणाम साधारणपणे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर अधिक पडतो. शाळांनी या बाबत लवकरच निर्णय घेतला तर विद्यार्थीच्या पाठीवरील ओझे कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे आता शाळांसमोर शैक्षणिक सत्र प्रारंभ होण्यापूर्वी हे ओझे कमी कसे करता येईल, हा निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यातून शाळा कोणता मार्ग निवडतात, याकडे पालकांचे लक्ष आहे.