बेलाड ग्रामपंचायतीत सरपंच-सचिवांच्या खुर्च्या पळवल्या..!!
By सदानंद सिरसाट | Updated: March 16, 2024 15:09 IST2024-03-16T15:09:45+5:302024-03-16T15:09:53+5:30
सदस्यांचा गदारोळ : गणपूर्तीअभावी ग्रामसभा तहकूब

बेलाड ग्रामपंचायतीत सरपंच-सचिवांच्या खुर्च्या पळवल्या..!!
मलकापूर (बुलढाणा) : सरपंच व सचिवांच्या मनमानी कारभाराला कंटाळून संतप्त सदस्यांनी बेलाड ग्रामपंचायतीत एकच गदारोळ माजवला. १५ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत सरपंच व सचिवांच्या खुर्च्या पळवण्यात आल्या. गणपूर्तीअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली.
तालुक्यातील बेलाड ग्रामपंचायतीत गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी व विरोधी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सरपंच व सचिवांच्या मनमानी कारभाराबाबत असंतोष खदखदत आहे. ही बाब १५ मार्च रोजी ग्रामसभेच्या माध्यमातून पुढे आली. ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी गत काळात जनहिताची कामे केली आहेत. त्याची देयके देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराला आजवर विरोधी सदस्यांचा विरोध होता. आता मात्र त्यात सत्ताधाऱ्यांची भर पडल्याने वाद उपस्थित झाला आहे.
१५ मार्च रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी सरपंच अनुपस्थित होते तर सचिव तथा ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी विकासकामांना सोडून ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत केलेल्या कामांच्या देयकावरच सदस्यांनी गदारोळ माजवला. तर संतप्त सदस्यांनी चक्क सरपंच व सचिवांच्या खुर्च्या पळवल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, गणपूर्तीअभावी बेलाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा तहकूब करण्यात आली.
- गटविकास अधिकाऱ्यांचे कानावर हात..!
बेलाड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत संताप सदस्यांनी गदारोळ माजवला. कामांच्या देयकांसाठी चक्क खुर्च्या पळवल्या. हा प्रकार काहींनी गटविकास अधिकारी उद्धव होळकर यांना कळवला. मात्र, त्यांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे.
प्रकृती बरी नसल्याने मला ग्रामसभेला जाता आले नाही. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे केला जातो. वास्तविक कुठल्याही सदस्याची किंवा ग्रामस्थांची समस्या असेल तर त्यावर गावपातळीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्या विषयावर बाहेर चर्चा व्हायला नको.
- सचिन संबारे, सरपंच, बेलाड
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विकासकामांऐवजी देयकांच्या विषयावरून सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सदस्य खुर्च्या त्यांच्या घरी घेऊन गेले. यावेळी विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही.
- राधेश्याम मादनकर, ग्रामसेवक, बेलाड