भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी
By Admin | Updated: April 10, 2017 00:31 IST2017-04-10T00:31:34+5:302017-04-10T00:31:34+5:30
बुलडाणा : ‘अहिंसा परमो धर्म’ व ‘जियो और जिने दो’चा संदेश संपूर्ण भारताला देणारे भगवान महावीर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी
बुलडाणा : ‘अहिंसा परमो धर्म’ व ‘जियो और जिने दो’चा संदेश संपूर्ण भारताला देणारे भगवान महावीर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून ९ एप्रिल रोजी शोभायात्रा काढण्यात आली.
भगवान महावीर यांचा जन्मकल्याणोत्सव संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त महावीरनगरस्थित दिगंबर चंद्रप्रभू जैन मंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी रस्त्यावर सडामार्जन व आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जैन मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ९ एप्रिल रोजी दिगंबर जैन चंद्रप्रभू जैन मंदिरातून शोभायात्रा सकाळी ७.३० वाजता काढण्यात आली. ही शोभायात्रा महावीरनगर, केशवनगर, एकतानगर, सर्क्युलर रोड मार्गे जैन मंदिरात पोहोचली. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करून पुष्पवृष्टी केली. चौका-चौकांत जैन बांधवांना सरबतचे वाटप करण्यात आले. ब्र्राम्हण जागृती सेवा संघ, उमेश गवले यांनी सरबतचे वाटप केले. शोभायात्रेत लहान मुले, आबालवृद्ध, महिला, तरुण यांनी केशरी फेटे परिधान केले होते. लहान मुलांनी जैन समाजाचा ध्वज हातात घेतले होते. तसेच पुरुषांनी व युवकांनी पांढरा पोषाख परिधान केला होता. शोभायात्रा सर्क्युलर रोड येथे आल्यानंतर भाजपाच्या शहराध्यक्षा विजया राठी, नगरसेवक गोंविद सराफ, उदय देशपांडे, मंदार बाहेकर यांनी जैन बांधवांवर पुष्पवृष्टी केली. भगवान महावीर जन्मकल्याणोत्सवाच्या वेळी सकाळी भगवान चंद्रप्रभू यांच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्यात आला. अभिषेक करण्यासाठी जैन बांधवांनी बोली लावली होती. यावेळी मंत्रोपच्चार व धार्मिक शास्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भगवंतांच्या जयघोषात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ‘भगवान महावीर की जय हो’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच ८ एप्रिल रोजी जैन युवा मंचातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. नगरनाईक, डॉ. बोराळकर, डॉ. मेहुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. सायंकाळी प्राची माडीवाले आणि त्यांच्या संचाने भजन संध्या कार्यक्रम सादर केला. शेवटी महाप्रसादाचा लाभ जैन बांधवांनी घेऊन जयंतीची सांगता करण्यात आली. यावेळी सकल दिगंबर जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.