अंगणवाडीचा केला वाढदिवस साजरा, इमारतीचे सात वर्षापासून रखडले काम
By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 17, 2023 18:15 IST2023-09-17T18:14:57+5:302023-09-17T18:15:13+5:30
डोणगाव येथे अनोखे आंदोलन, अंगणवाडीच्या कामाच्या चौकशीची मागणी

अंगणवाडीचा केला वाढदिवस साजरा, इमारतीचे सात वर्षापासून रखडले काम
डोणगाव : वाढदिवस अनेकांचा साजरा केला जातो. परंतु एखाद्या नादुरुस्त इमारतीचा वाढदिवस साजरा केल्या जात असल्याचा प्रकार डोणगाव येथे समोर आला आहे. सात वर्षापूर्वी बांधलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे काम आजपर्यंत पूर्ण न झाल्याने तिचा प्रतिकात्मक वाढदिवस तोही सातवा वाढदिवस डोणगाव येथील वार्ड क्रमांक एकमध्ये रविवारी साजरा करण्यात आला.
वाढदिवसाच्या या अनोख्या आंदोलनाने सर्वांनाच अवाक केले आहे. डोणगाव येथील वार्ड क्रमांक एकमध्ये सात वर्षापूर्वी महिला व बालकल्याण विभागाने जवळपास आठ ते १० लाख रुपये खर्च करून चिमुकल्यांसाठी अंगणवाडीच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली होती. परंतु आज रोजी ही अंगणवाडी अर्धवट स्थितीत असून त्यामध्येही जळतण व घाणीचे प्रमाण वाढलेले आहे. या अंगणवाडभचे काम निकृष्ट झालेले असून, अर्धवट उभ्या असलेल्या अंगणवाडीच्या छताला मोठे छिद्र पडले आहे. तेथे आजपर्यंत अंगणवाडी सुरू न झाल्याने डोणगाव येथील वार्ड क्रमांक एकमधील अमोल धोटे व शिवसेना शहरप्रमुख सूरज दिनोरे, नीलेश सदावर्ते व अंगणवाडीतील मुले व महिलांनी अंगणवाडी येथे केक कापून अंगणवाडीचा सातवा वाढदिवस साजरा केला.
अंगणवाडीच्या कामाच्या चौकशीची मागणी
यावेळी कंत्राटदार व त्यावेळेस ज्या लोकप्रतिनिधीच्या काळात अंगणवाडीचे काम करून पैसे काढले, त्याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कामात गैरप्रकार करणाऱ्यांविषयी रोष व्यक्त करण्यात आला.