साखरखेर्डा येथील काेविड केअर सेंटर रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:15 IST2021-05-04T04:15:24+5:302021-05-04T04:15:24+5:30
साखरखेर्डा : परिसरात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे, साखरखेर्डा येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी हाेत ...

साखरखेर्डा येथील काेविड केअर सेंटर रखडले
साखरखेर्डा : परिसरात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे, साखरखेर्डा येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी हाेत आहे. काेविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला हाेता. त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर काेविड केअर सेंटरसाठी स्मरणपत्र दिली आहेत, याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
साखरखेर्डा गावाची लोकसंख्या २० हजार असून, परिसरातील २३ खेडी या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येतात. कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी गावातील आणि परिसरातील शेकडो नागरिक, महिला आपली कोरोना तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत आहेत. गेल्या सोमवारपासून ११६ जणांची आरटीपीसीआर तपासणी केली असता १६ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. हा आकडा साखरखेर्डासाठी खूपच मोठा असून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी तत्काळ दखल घेऊन साखरखेर्डा येथे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे.
साखरखेर्डा येथे काेविड सेंटर सुरू करावे, यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागील आठवड्यात मागणी केली होती. सहकार विद्या मंदिराची इमारत कोविड सेंटरसाठी उपयुक्त असल्याचा अहवाल तहसीलदार सुनील सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र साळवे यांनी दिला होता. ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला होता. परंतु या अहवालाची फाईल आजही त्यांच्याकडे पडून असून, त्यांना स्मरणपत्र दिल्याची माहिती जबाबदार अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
साखरखेर्डा येथील कोरोना रुग्णांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काेविड सेंटर तत्काळ सुरु करावे.
राजेश ठोके,
माजी सभापती
काेविड सेंटरसाठी कर्मचारी नियुक्त करावे लागत असल्याने ती प्रक्रिया दोन दिवसात मार्गी लागेल आणि कोविड सेंटर सुरू करण्यात येईल. सुनील सावंत
तहसीलदार, सिंदखेडराजा
सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून, याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविण्यात आली आहे.
डॉ. सदानंद बनसोड, तालुका वैद्यकीय अधिकारी, सिंदखेडराजा