सावधान, कमी झोपेमुळे रोगप्रतिकारशक्तीही खालावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:11+5:302021-08-28T04:38:11+5:30
सध्याचे युग हे खूप धावपळीचे आहे. यामुळे सर्वांच्याच जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री आराम करण्याऐवजी ...

सावधान, कमी झोपेमुळे रोगप्रतिकारशक्तीही खालावते
सध्याचे युग हे खूप धावपळीचे आहे. यामुळे सर्वांच्याच जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री आराम करण्याऐवजी अनेक जण मोबाइलवर मोठ्या प्रमाणात वेळ घालवतात. त्यामुळे अनेकांना उशिरा झोपण्याची सवय जडली आहे. परिणामी, पुरेशी झोप होत नसल्याने त्याचा रोगप्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होत आहे.
किमान आठ तास झोप आवश्यक
माणसाला किमान आठ तास झोप घेण्याची आवश्यकता असते. पुरेशी झोप झाल्यास शक्यतो आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी येत नाहीत. दिवसभर कार्यालयात किंवा इतर ठिकाणी काम केल्याने मोठ्या प्रमाणात थकवा येतो. हा थकवा घालवण्यासाठी झोपेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पुरेशी झोप झाल्यास कामातही मन लागते आणि एकाग्रता वाढते.
अपुऱ्या झोपेचे तोटे..
१ मधुमेह असलेल्या लोकांना झोप लवकर लागत नाही. पुरेशी झोप न झाल्यामुळे चिडचिड मोठ्या प्रमाणात वाढते.
२ दररोज पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना आठ तास झोप घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.
३ झोपेच्या अभावामुळे इन्सुलीनची निर्मिती करणाऱ्या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित होते.
रोग प्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल
रोग प्रतिकारशक्ती विविध आजारांपासून मानवी शरीराचे संरक्षण करते. रोग प्रतिकारशक्ती चांगली असलेल्या व्यक्तींना कोणत्याही आजाराची लागण सहज होत नाही. कोरोनासारख्या जीवघेण्या आजारापासूनही यामुळे अनेकांना संरक्षण मिळाले आहे. कोरोना आजारावर ठोस उपाय नसल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्याचा सल्ला डॉक्टरांच्यावतीने देण्यात येत आहे. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्यांना कोरोनाची लागण झाली नाही.
संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक तर असतेच, शिवाय पुरेशी झोप लागण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामही तेवढाच महत्त्वाचा आहे. फास्टफुडऐवजी पोषक आहार व फळांचे सेवन अधिक प्रमाणात करणे गरजेचे आहे.
आठ तासापेक्षा कमी झोप झाल्यास बद्धकोष्टता, ॲसिडीटी, पोट फुगणे आणि पोटाच्या इतर समस्या जाणवतात. आपण वारंवार आजारी पडत असाल तर हे कमी रोग प्रतिकारशक्तीचे सामान्य लक्षण आहे. पुरेशी झोप न झाल्यास तणावही मोठ्या प्रमाणात वाढतो.
-डॉ. पी. आर. उमरकर, जनरल फिजिशियन.
वयोगटानुसार किमान झोपेचे तास
०-३ महिने :१४-१७
४-११ महिने : १२-१५
१-२ वर्षे ११-१४
३-५ वर्षे १०-१३
६-१३ वर्ष : ९-११
१४-१७ : ८-१०
१६-६४ : ७-८
६५ वर्षांपुढील : ७-८