मोफत पास योजनेची मुदत संपल्याने विद्यार्थिनी अडचणीत
By Admin | Updated: March 25, 2017 02:37 IST2017-03-25T02:37:54+5:302017-03-25T02:37:54+5:30
३१ मार्चला मुदत संपणार: एप्रिल महिन्यात परीक्षा

मोफत पास योजनेची मुदत संपल्याने विद्यार्थिनी अडचणीत
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. २४- एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. याशिवाय अहल्याबाई होळकर मोफत प्रवास सवलत योजनेंतर्गत शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात किंवा बाहेरगावी जाणार्या विद्यार्थिनींसाठी एसटी बसने मोफत प्रवासाची सोय करण्यात आली; मात्र मोफत पासची मुदत ३१ मार्च रोजी संपणार असल्याने व एप्रिल महिन्यात परीक्षा असल्यामुळे या योजनेचा लाभ घेणार्या विद्यार्थिनींच्या पुढे अडचण उभी राहिली आहे.
शहर परिसरात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनींना बसच्या पाससाठी दर महिन्याला पैसे मोजावे लागत होते. ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना लागू केली. ही योजना १९९६ पासून लागू करण्यात आली असून, या योजनेत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणार्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाची सोय केली आहे. यावर्षी शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवासाची सुविधा ३१ मार्चपर्यंत देण्यात आली आहे; मात्र परीक्षा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे मोफत प्रवासाची सुविधा घेणार्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी अडचणीत आल्या आहेत. यासाठी एसटी महामंडळाने विद्यार्थिनींना मोफत प्रवासासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.
संबंधित शाळेने प्रस्ताव सादर करावा!
अहल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत प्रवास योजना एप्रिल महिन्यात परीक्षा काळात सुरू ठेवण्यासाठी संबंधित शाळेने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पत्रासह प्रस्ताव सादर केल्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती बुलडाणा आगार प्रमुख दीपक साळवे यांनी दिली.
सदर योजनेस ३१ मार्चनंतरही मुदतवाढ दिल्यास एप्रिल महिन्यात परीक्षा असलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होईल.
-अ.ज. सोनवणे, माध्यमिक, शिक्षणाधिकारी, बुलडाणा