मालवाहू वाहन झाडावर आदळले : दाेन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST2021-05-28T04:25:56+5:302021-05-28T04:25:56+5:30
मेहकर : डाळिंब घेऊन जात असलेले शेतकऱ्यांचे मालवाहू वाहन झाडावर आदळले. यामध्ये मेहकर तालुक्यातील दाेन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

मालवाहू वाहन झाडावर आदळले : दाेन युवक ठार
मेहकर : डाळिंब घेऊन जात असलेले शेतकऱ्यांचे मालवाहू वाहन झाडावर आदळले. यामध्ये मेहकर तालुक्यातील दाेन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना २६ मे राेजी मध्य प्रदेशातील सागर शहरापासून ५० कि.मी. अंतरावरील रहेली गावाजवळ घडली. अमोल अशोक पानखेडे (२७) व जगदीश प्रभाकर आंभोरे (२७) असे मृतकांची नावे आहेत.
शिवसेनेचे नगरसेवक रामेश्वर भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महादेव वेटाळमधील अमोल अशोक पानखेडे हा व चालक नांद्रा धांडे येथील जगदीश प्रभाकर आंभोरे हे दोघे जण मालवाहू वाहन क्रमांक एमएच २८ बीबी २७२५ ने डाळिंब घेऊन जबलपूर (मध्य प्रदेश) कडे जात हाेेते. दरम्यान, २६ मेस रात्री अंदाजे ७ वाजता सागर शहरापासून ५० कि.मी. दूर रहेली गावाजवळ एका झाडावर हे वाहन आदळले. या अपघातात दोघेही ठार झाले. या अपघाताची बातमी सागर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक यांनी शिवसेनेचे नगरसेवक रामेश्वर भिसे यांना सांगितली. त्यानंतर रामेश्वर भिसे यांनी खा. प्रतापराव जाधव यांना ही बातमी सांगितली. खा. प्रतापराव जाधव यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांसोबत बातचित करून सर्व शासकीय सोपस्कार लवकर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. गुरुवारी नगरसेवक रामेश्वर भिसे यांनी दोन्ही मृतदेह आणण्यासाठी मेहकर येथून वाहन पाठवले असून रात्री उशिरा ते मेहकरात येतील.
दरम्यान, दोघा मृतकांच्या पत्नी पहिल्यांदा गर्भवती आहेत.