दोन टोल नाक्यांवर कार, जीप व एसटीला सूट
By Admin | Updated: June 1, 2015 01:55 IST2015-06-01T01:55:29+5:302015-06-01T01:55:29+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील दोन महार्गावरील टोल मुक्ती.

दोन टोल नाक्यांवर कार, जीप व एसटीला सूट
बुलडाणा : जिल्ह्यातील दोन महार्गावरील टोल नाक्यांवर ३१ मे २0१५ च्या मध्यरात्रीपासून जीप, कार व एसटी महामंडळाच्या बसेसना टोलमुक्ती देण्यात येत आहे. या पथकर स्थानकांवर कार, जीप व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र दोन मार्गदर्शिका ठेवण्यात याव्यात अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या पथकर स्थानकावर ठळक अक्षरात फलक लावण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. या टोल सूट असणार्या पथकर नाक्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खासगीकरणांतर्गत खामगाव बाह्यवळण रस्त्यावरील रावणटेकडी आणि खासगीकरणांतर्गत मलकापूर - चिखली-बुलडाणा-राज्य महामार्गावर दाताळा गावाजवळ तर येळगाव गावाजवळ असणार्या पथकर स्थानकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर स्थानकांपैकी ११ पथकर स्थानके व रस्ते विकास महामंडळाकडील ५३ पथकर स्थानकांपैकी १ पथकर स्थानक अशी एकूण १२ पथकर स्थानके ३१ मे २0१५ रोजी मध्यरात्री १२.00 वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला होता.