जिल्हावासीयांचे दरडोई उत्पन्न ५0 हजार
By Admin | Updated: June 28, 2014 22:40 IST2014-06-28T22:36:13+5:302014-06-28T22:40:18+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील नागरीकांचे प्रतिवर्षी दरडोई उत्पन्न ५0 हजार ७७२ रूपये झाल्याचे दिसुन येते.

जिल्हावासीयांचे दरडोई उत्पन्न ५0 हजार
बुलडाणा : जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करताना विविध क्षेत्रातील आकडेवारी ही अतिशय उपयुक्त ठरते. शासनाने याकरीता जिल्हास्तरावर सांख्यीकी विभाग कार्यरत केला असून दरवर्षी या विभागाद्वारे जिल्ह्याच्या विकासाची गती व स्थिती सांगणारी आकडेवारी प्रसिद्ध होते. सन २0१२-१३ या वर्षातील आर्थिक समालोचनाचे अवलोकन केले असता बुलडाणा जिल्ह्यातील नागरीकांचे प्रतिवर्षी दरडोई उत्पन्न ५0 हजार ७७२ रूपये झाल्याचे दिसुन येते. विकासाच्या विविध योजना, त्यांची उपलब्धी व विकास दर, वाढती लोकसंख्या, त्याची घनता, स्त्री-पुरुष प्रमाण, बाजारभाव, महागाई, सिंचन, वने, साक्षरता, हवामान, पर्जन्यमान याची आकडेवारी जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करताना अतिशय उपयुक्त ठरते. किंबहुना याच आकडेवारीवरुन जिल्ह्याची आर्थिक क्षमता समोर येते. जिल्ह्याची लोकसंख्या व एकूण उत्पन्न याचा विचार करुन दरडोई उत्पन्न काढल्या जाते. सन २000 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचे सरासरी दरडोई उत्पन्न १४ हजार ३४0 एवढे होते ते १0 वर्षात म्हणजेच २0१0-११ या वर्षामध्ये ४0 हजार ३३२ एवढे झाले. तर सरत्या वर्षात दरडोई उत्पन्न हे ४५ हजार ६९९ एवढे आहे. उत्पन्न स्त्रोत पद्धती या संकल्पनेचा अवलंब करून काढल्या जात असते म्हणून हा अंदाज ढोबळ असतो. सन २0१२-१३ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न हे ५0 हजार ७७२ एवढे झाले आहे. सांख्यीकी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक समालोचनामध्ये अनेक विभागांची आकडेवारी ही रंजक व उपयुक्त अशी आहे. जिल्ह्यातील १४२ नोंदणीकृत कारखान्यांमध्ये ६ हजार मजूरांची उपस्थिती असते तर बैलगाडयांची संख्या कमी होत असून सध्या ५५ हजार बैलगाड्या आहेत. बाजारभावापासून तर उद्योगापर्यंत अन् शिक्षणापासून आरोग्यापर्यंत सर्व विभागांची माहिती समालोचनात असली तरी अनेक विभागांची माहिती अपडेट नाही. कृषी, शिक्षण, पाणीपुरवठा यांची आकडेवारी जुनीच आहे. ती अपडेट करण्याची गरज आहे.