उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST2021-01-17T04:29:48+5:302021-01-17T04:29:48+5:30
लोणार : ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली गावागावातील लगबग, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ १५ जानेवारी रोजी संपली ...

उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद
लोणार : ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली गावागावातील लगबग, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ १५ जानेवारी रोजी संपली आहे. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची ५२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. निवडणुकीचे मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला.
सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. अखेर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लाखो उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून उमेदवार व कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. आता उमेदवार आणि कार्यकर्त्यांना १८ जानेवारीची म्हणजेच निकालाच्या दिवशीची वाट पाहावी लागणार आहे. ग्रामपंचायत मतमोजणी तहसील कार्यालय, लोणार येथे सकाळी ठीक ८ वाजता सुरू होणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात येईल व त्यानंतर ई.व्ही.एम.वरील मतमोजणी करण्यात येणार आहे. एकूण ८ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून फेरीनिहाय व प्रभागनिहाय मतमोजणी करण्याकरिता ७ मतमोजणी पर्यवेक्षक व १४ मतमोजणी सहायक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
संबंधित उमेदवार तथा त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणी ओळखपत्राशिवाय मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे.
सैपन नदाफ, तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी, लोणार
बॉक्स
लाेणार तालुक्यात ७७.६३ टक्के मतदान
१५ जानेवारी रोजी १६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियामध्ये महिलांनी पुरुषांच्या जवळपास समप्रमाणात मतदान केल्याचे दिसून येत आहे. एकूण महिला व पुरुष मतदारांपैकी ७८.५१ टक्के पुरुषांनी, तर ७७.६३ टक्के महिलांनी मतदान केले आहे. यावरून महिलांमध्ये मतदान करण्याच्या संदर्भात जागरूकता निर्माण होत असल्याची चांगली बाब समोर आली आहे.