वेळापत्रकातील बदलाने परीक्षार्थ्याची तारांबळ
By Admin | Updated: May 9, 2015 01:53 IST2015-05-09T01:53:51+5:302015-05-09T01:53:51+5:30
परीक्षार्थीसमोर विवाह की पेपर? असा पेच.

वेळापत्रकातील बदलाने परीक्षार्थ्याची तारांबळ
लोणार : तालुक्यातील डॉ.लाहोटी बी.एड्. महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या वेळा पत्रकावरून विवाह ९ मे रोजी ठेवला होता; परंतु बी.एड्.चा २0 एप्रिल रोजी होणारा पेपर विद्यापीठाने रद्द करून ९ मे रोजी ठेवल्याने परीक्षार्थ्याची तारांबळ उडाली असून, परीक्षार्थीसमोर विवाह की पेपर? असा पेच निर्माण झाला आहे. मनुष्याच्या आयुष्यात सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे लग्न सोहळा, आयुष्यातील सतरा भानगडी बाजूला ठेवून लग्न सोहळ्याचा मुहूर्त काढल्या जातो; मात्र एवढे करूनही लग्नाच्या दिवशी विघ्न आलेच तर त्याला काय म्हणावं. तालुक्यातील डॉ.लाहोटी बी.एड्. महाविद्यालयात सत्र २0१४-१५ मध्ये बी.एड्.चे शिक्षण घेणार्या विजय बबन सानप या विद्यार्थ्याने बीएड्च्या परीक्षेचे वेळापत्रक पाहून आपल्या लग्नाचा मुहूर्त काढला होता; परंतु २0 एप्रिल रोजी होणारा भारतीय समाजशील शिक्षक विषयाच्या पेपरच्या पाकीटात शैक्षणिक मानसशास्त्र विषयाचा पेपर निघाला. त्यामुळे २0 एप्रिल रोजी होणारा उद्योन्मुख भारतीय समाजशील शिक्षक विषयाचा पेपर विद्यापीठाने रद्द करून ९ मे रोजी ठेवला. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे परीक्षेच्या वेळा पत्रकात बदल होऊन विजयच्या ऐन विवाहाच्या दिवशी पेपरचा मुहूर्त ठरला. यामुळे विजयसमोर विवाह की पेपर? असा पेच निर्माण झाला आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून विजयने शिक्षणाला प्राधान्य देत हळद लावलेल्या अंगाने का होईना पेपर देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराने लग्न सोहळ्याच्या दिवशी विजयला आयुष्याच्या वळणावर दोन महत्त्वपूर्ण परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.