पालिकेने केलेली करवाढ रद्द करावी
By Admin | Updated: May 5, 2015 00:10 IST2015-05-05T00:10:38+5:302015-05-05T00:10:38+5:30
बुलडाणा नगरपालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच मालमत्ता करवाढ केल्याचा आरोप.

पालिकेने केलेली करवाढ रद्द करावी
बुलडाणा : नगरपालिकेने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच मनमानी मालमत्ता करवाढ करून शहरातील मालमत्ताधारकांवर अन्याय केला. ही बेकायदेशीर करवाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष अँड. अमोल बल्लाळ यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली. पालकमंत्री खडसे बुलडाणा येथे आले असताना भाजपच्या एका शिष्टमंडळाने या विषयात त्यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, नगरपालिकेने १६ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. १ नुसार नगर परिषद हद्दीमधील मालमत्ताकर, पाणीपट्टी तसेच इतर कामांसाठी लागणार्या शुल्कात दुप्पट-तिपटीने बेकायदेशीररीत्या व मनमानी पद्धतीने वाढ केली. या करवाढीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे त्या-त्या विभागांना ताकीद देण्यात आली आहे. वरिष्ठांच्या या आदेशानुसार १ एप्रिलपासून नवीन दराने कराची वसुली करणे कर्मचार्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी व लघुव्यवसायिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. वास्तविक, कोणतीही करवाढ करताना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कायद्यानुसार व उपविधीनुसार करावयाचे अपेक्षित होते तसेच मालमत्ता करात वाढ करण्यासाठी मालमत्ताधारकांना त्यासंबंधी नोटीस पाठवून त्यांच्याकडून ना-हरकत नोटीस घेणे गरजेचे होते. तथापि, पालिकेकडून यासंबंधी कसलीही कार्यवाही पूर्ण करण्यात आली नाही. अशाप्रकारे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर लावलेले बेकायदेशीर कर रद्द करण्यात यावेत, अशी मागणी अँड. अमोल बल्लाळ, प्रभाकर वारे, अँड. राजेश वानखेडे आदी भाजप पदाधिकार्यांनी केली आहे.