ग्रा.पं.च्या दहा जागांकरिता पोटनिवडणूक
By Admin | Updated: May 1, 2017 01:35 IST2017-05-01T01:35:41+5:302017-05-01T01:35:41+5:30
नांदुरा- नांदुरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या दहा रिक्त जागांची पोटनिवडणूक होऊ घातली असून, येत्या २७ मे रोजी मतदान होणार आहे.

ग्रा.पं.च्या दहा जागांकरिता पोटनिवडणूक
नांदुरा : सप्टेंबर १७ पर्यंत मुदती संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून, यासोबतच नांदुरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या दहा रिक्त जागांची पोटनिवडणूक होऊ घातली असून, येत्या २७ मे रोजी मतदान होणार आहे. सदर सात ग्रामपंचायतींकरिता आचारसंहिता लागू झाली आहे.
तालुक्यातील हिंगणा भोटा येथे एसटी प्रवर्गाच्या राखीव तीन जागा रिक्त असून, पोटनिवडणुकीतही हा प्रवर्ग कायम आहे. त्यामुळे आताही उमेदवार राहण्याची शक्यता नाही. दादगाव येथे वार्ड क्र.३ मधील एसटी राखीव जागेकरिता प्रवर्गातील उमेदवार नसल्याने जागा रिक्त होती. यावेळी ही जागा सर्वसाधारण महिलाकरिता राखीव आहे. पलसोडा येथील वार्ड क्र.१ व २ एसटी राखीव असल्याने उमेदवार नव्हते म्हणून रिक्त आहे. यावेळीही एसटी राखीव प्रवर्गच आहे. सिरसोडी येथील वार्ड क्र.३ मध्ये एसटी राखीव जागा असल्याने उमेदवार नव्हता. यावेळी ही जागा सर्वसाधारण महिला राखीव आहे. मोमीनाबाद वार्ड क्र.२ मध्ये एसटी राखीव असल्याने रिक्त असलेली जागा यावेळीही एसटी राखीवच आहे. धानोरा (वि.) येथील योगीता संदीप गावंडे ह्या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक असून, ही जागा सर्वसाधारण महिला राखीव आहे. जिगाव येथील सुनंदाताई वसंतराव भोजने ह्या जि.प. सदस्य म्हणून निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक असून, ही जागा ओबीसी महिला राखीव आहे. उमेदवारी अर्ज भरणे ५ ते १२ मे, छाननी १५ मे, उमेदवारी मागे घेणे १७ मे, अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप १७ मे दुपारी ३ नंतर, मतदान २७ मे रोजी तर मतमोजणी २९ मे रोजी होणार आहे.