व्यापा-यांचे कामबंद आंदोलन; व्यवहार ठप्प!
By Admin | Updated: July 12, 2016 00:19 IST2016-07-12T00:19:32+5:302016-07-12T00:19:32+5:30
अडत-व्यापा-यांचा बंद; बाजार समितीमध्ये शुकशुकाट

व्यापा-यांचे कामबंद आंदोलन; व्यवहार ठप्प!
खामगाव (जि. बुलडाणा): कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री होणार्या कृषी मालाची अडत शेतकर्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्यात यावी, असा अध्यादेश शासनाने काढला असून, या विरोधात जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत-व्यापार्यांनी बंद पुकारला आहे. दरम्यान, शनिवारपासून बाजार समितीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
बाजार समितीमध्ये विक्री होणार्या कृषी मालाची शेतकर्यांकडून अडत न कापता ती खरेदीदारांकडून कपात करण्यात यावी, असा अध्यादेश राज्य शासनाने ५ जुलै रोजी काढला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापार्यांनी एकजूट दाखवत शनिवारीपासून बंद पुकारला आहे. दरम्यान, या बंदमध्ये स्थानिक व्यापार्यांनी सहभागी होत सोमवारला सुद्धा व्यवहार बंद ठेवले. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले होते. खामगाव येथील बाजार समितीमधील व्यापार्यांनीही यात सहभागी होत बंद पुकारला. शासनाने तो अध्यादेश मागे घ्यावा, अशी व्यापार्यांची मागणी आहे. मात्र या बंदमुळे शेतकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. बंदची माहिती नसल्याने शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकर्यांना शेतमाल परत न्यावा लागला, तर काही शेतकर्यांचा शेतमाल बाजार समितीमध्येच पडून आहे. व्यापार्यांच्या बंदमुळे बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.