सावरगाव मार्गावर आठ दिवसांपासून बसेस बंद

By Admin | Updated: July 18, 2016 02:27 IST2016-07-18T02:27:41+5:302016-07-18T02:27:41+5:30

नांद्रा येथील प्रवाशांचे हाल, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

Buses closed on the Savargaon Road for eight days | सावरगाव मार्गावर आठ दिवसांपासून बसेस बंद

सावरगाव मार्गावर आठ दिवसांपासून बसेस बंद

नांद्रा (जि. बुलडाणा) : गेल्या आठ दिवसांपासून लोणार-सावरगाव रोडवरील बससेवा कायमस्वरूपी बंद झाल्याने या मार्गावरील प्रवाशांचे फार हाल होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
लोणार बसस्थानकांतर्गत येणार्‍या या मार्गावर सर्वात जास्त प्रवासी वाहतूक आहे. सावरगाव, टिटवी, पांग्रा हे जास्त लोकवस्ती असणारी गावे या रोडवर असून या व इतर गावांसह मराठवाड्यातील बर्‍याच गावांचा लोणारशी संपर्क येतो. या मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते. शिवाय शिक्षणासाठी लोणारला जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठय़ा प्रमाणात आहे; परंतु त्याप्रमाणात या मार्गावर बसफेर्‍या अपुर्‍या आहेत. त्यामुळे हय़ा मार्गावरील प्रवाशांची नेहमीच गैरसोय होत असते. आता तर आठ दिवसांपासून या रोडवरील सर्वच बसफेर्‍या बंद झाल्या आहेत. मुलीकरिता मानव विकासच्या दोन फेर्‍या तेवढय़ा येतात. त्यामुळे प्रवाशांची व विद्यार्थ्यांची फार गैरसोय होत आहे. पासेस असून खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असल्याने त्यांना आर्थिक झळासुद्धा सोसावी लागत आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांनी तर पैशाच्या अडचणीमुळे शाळेत जाणेच बंद केले आहे. या संधीचा खासगी वाहनधारक चांगलाच फायदा घेत आहेत. कमीत कमी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बसची व्यवस्था करावी, अशी मागणी राजेश मोहिते, शिवाजी मुंढे, शिवाजी डोळे, केशव फुपाटे, यांच्यासह अनेक पालकांनी केली आहे.

Web Title: Buses closed on the Savargaon Road for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.