बस स्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:30+5:302021-08-25T04:39:30+5:30
बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बस स्थानकावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे, बस स्थानकातील विक्रेत्यांची संसाराची गाडी पुन्हा ...

बस स्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर!
बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बस स्थानकावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे, बस स्थानकातील विक्रेत्यांची संसाराची गाडी पुन्हा रुळावर येत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात काेराेना संक्रमण वाढल्याने एसटी बस बंद करण्यात आल्या हाेत्या. याचा फटका बस स्थानकावर विक्रेत्यांनाही बसला हाेता. या विक्रेत्यांना एसटी महामंडळाला ठराविक रक्कम द्यावी लागते. मात्र,जवळपास वर्षभर एसटी बस बंदच असल्याचे विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली हाेती. आता बस फेऱ्या पूर्ववत हाेत असल्या तरी लांब पल्याच्या बसची अजूनही प्रतीक्षा आहे. शाळाही बंद असल्याने बस स्थानकावर असलेली कॅन्टीन व इतर विक्रेत्यांचा व्यवसाय अजूनही पूर्ववत झालेला नाही़
बस स्थानकावर खरमुरे विकणाऱ्या शेख गुलाब शेख इस्माईल यांना २१०० रुपये दरमहा एसटी महामंडळाला द्यावे लागतात़ त्यांना काेराेनाच्या काळात माेठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला़ बसच बंद असल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला हाेता़ आता पुन्हा बसफेऱ्या सुरू झाल्याने हळुहळु व्यवसाय पूर्वपदावर येत आहे़ मात्र, अजूनही पूर्णपणे सुरळीत झाला नसल्याचे शेख गुलाब शेख इस्माइल यांनी सांगितले़
काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता कुठे व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत़ अजूनही दूरच्या गावावरून येणारे प्रवासी येत नाहीत़ त्यामुळे, व्यवसाय केवळ २० ते ४० टक्केच पूर्ववत झाला आहे़ कॅन्टीनचे भाडे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन काढणेही कठीण झाले आहे़ तरीह पूर्वीपेक्षा आता परिस्थिती सुधारत आहे, असे कॅन्टीन चालक भारत शेळके यांनी सांगितले़
एसटी महामंडळाला द्यावे लागते शुल्क
बस स्थानकावर विविध विक्रेत्यांकडून शुल्क आकारणी करण्यात येते़ कॅन्टीनचे दरमहा ५५ हजार रुपये भाडे आहे़
तसेच खरमुरे विक्रेत्याला दरमहा २१०० रुपये द्यावे लागतात़ तसेच अन्य एका विक्रेत्याला दर महिन्याला २९०० रुपये एसटी महामंडळाला द्यावे लागतात़