वाहतूक पोलिसांवर अडीच लाख वाहनांचा भार
By Admin | Updated: December 28, 2016 16:07 IST2016-12-28T16:07:55+5:302016-12-28T16:07:55+5:30
रस्त्यावर अडीच लाख वाहने आणि वाहतूक नियंत्रण करणारे 194 मनुष्यबळ असल्याने वाहतूक व्यवस्था सुस्थितीत हाताळणे कठीण झाले आहे.

वाहतूक पोलिसांवर अडीच लाख वाहनांचा भार
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 28 - रस्ते आणि वाहनांच्या संख्या पाहता प्रचंड तफावत दिसून येते. दर दिवसाला रस्त्यावर शेकडो नवीन वाहने येत असताना वाहतूक नियंत्रण करणारे मनुष्यबळ मात्र तोकडेच आहे. रस्त्यावर अडीच लाख वाहने आणि वाहतूक नियंत्रण करणारे 194 मनुष्यबळ असल्याने वाहतूक व्यवस्था सुस्थितीत हाताळणे कठीण झाले आहे.
शहरासह जिल्हाभरातील वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी आणि शिपायांची आकडेवारी ही बोटावर मोजण्याइतकी आहे. परिणामी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. वाहने चालवण्याचा परवाना आरटीओंकडून दरदिवसाला दिला जात आहे. मात्र रस्त्यांची मर्यादा आणि दुर्दशेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षकांसह एकूण 31 कर्मचारी कर्तव्यावर आहेत. याप्रमाणे शहर वाहतूक शाखेत एक पोलीस निरीक्षक आणि 11 कर्मचारी आहेत. याशिवाय जिल्ह्यातील 30 पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी पाच याप्रमाणे 150 वाहतूक कर्मचारी आहे. अशा एकून 194 कर्मचा-यांवर अडीच लाखाच्या वर असलेल्या वाहनांवर ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी आहे.
जिल्ह्यात धावतात 2,54,356 वाहने
मोटर सायकल 1,55,772
स्कूटर 12,349
मोपेड 24377
मोटर केअर्स 7080
जीप 4718
स्टेशन वॅगॉन 186
टॅक्सी 1771
ऑटोरिक्शा 13129
स्टेजकॅरेज 440
मिनी बस 99
स्कूल बस 139
प्रायव्हेट सर्व्हिस वाहन 36
अॅम्ब्युलन्स 149
ट्रक आणि लॉरी 2730
टँकर 57
चारचाकी वाहन 3851
तीन चाकी व्हॅन 3775
ट्रॅक्टर 14766
ट्रॅव्हल्स 8800
इतर 133
पोलिसांच्या संख्या तोकडी
जिल्ह्यात लाखो वाहन धावत असून वाहतूक पोलिसांची संख्या तोडकी आहे. वाहनांची संख्या वाढल्याने अपघातसुद्धा वाढले आहेत. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवल्यास वाहतुकीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते - बी.डी फोन्दे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, बुलडाणा