अवघ्या शहराचा भार केवळ पाच जलकुंभांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST2021-03-13T05:03:28+5:302021-03-13T05:03:28+5:30
चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची ...

अवघ्या शहराचा भार केवळ पाच जलकुंभांवर!
चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची निर्मिती केली; परंतु अद्याप या नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. या जलकुंभातून पाणी पुरवठा झाल्यास चिखलीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याने पालिकेने त्यानुषंगाने नियोजन करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शहराच्या पाणी पुरवठ्याचा भार केवळ पाच जलकुंभांवर आहे.
चिखली शहराला सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्पावरून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही शहरवासीयांना आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. अनेक वेळा १५ दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने शहरात पाणीबाणीची स्थिती उद्भवते. त्यात कधी जलशुद्धीकरण केंद्र व पाणी उपसा करणाऱ्या मोटारींमध्ये बिघाड, तर कधी जलवाहिनीला गळती आदी तांत्रिक कारणांमुळे शहरवासीयांना सातत्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. पालिकेची जुनाट व सदोष वितरण व्यवस्था शहर पाणी पुरवठ्याची मोठी अडचण असल्याचे रडगाने सातत्याने गायले जाते; मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी कोणी फारसे उत्सुक नाहीत.
कार्यान्वित असलेल्या जलकुंभांची क्षमता
जलशुद्धी केंद्रात पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर शहरात त्याचे वितरण करण्यासाठी पालिकेकडे आज रोजी साठवणुकीसाठी ५ जलकुंभ आहे. यातील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जुनी टाकी : क्षमता १२ लाख लिटर, शिवाजी उद्यान टाकी ४.५ लाख लिटर, पुंडलीक नगर टाकी ३.५ लाख लिटर, जाफ्राबाद रोड टाकी ३.५ लाख लिटर, रोहिदास नगरमधील टाकी ५ लाख लिटर क्षमतेचे एकूण ५ जलकुंभ आहेत. याची एकूण साठवण क्षमता २८.५ लाख इतकी आहे.
महामार्गाखाली दबला जलवाहिनीचा व्यास !
पेनटाकळी प्रकल्पावरून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविणारी जलवाहिनी नवीन महामार्गाखाली दबल्या गेली आहे. जलवाहिनीवर दबाव वाढल्याने त्याचा व्यासदेखील कमी झाला आहे. परिणामी, जिथे पूर्वी १०० लिटर पाणी पोहोचत होते तेथे आता केवळ ५५ लिटर पाणी या जलवाहिनीद्वारे पोहोचत असल्यानेदेखील शहराचा पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे.
४४ कोटींचा नवीन प्रस्ताव !
शहराची पाइपलाइन १९९९ सालाची असून, ती आता कालबाह्य ठरत आहे. यानुषंगाने पालिकेद्वारे स्थानिक वायझडी धरणावरून नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचे टेंडरदेखील आहे. तर ४४ कोटींचा नवीन प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र, तीन नवीन जलकुंभ आणि पाइपलाइनचा समावेश आहे.
वायझडी धरणावरून पाणी पुरवठ्याचे टेंडर झाले आहे. नवीन प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. याद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना ६ व्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे.
अभिजीत वायकोस
मुख्याधिकारी, न.प.चिखली.