शुद्ध पाण्याचा नावाखाली बुलडाण्यात आरोग्याशी खेळ
By Admin | Updated: March 22, 2017 02:18 IST2017-03-22T02:18:07+5:302017-03-22T02:18:07+5:30
विंधन विहिरींचे पाणी धोकादायक; नियमावली नाही

शुद्ध पाण्याचा नावाखाली बुलडाण्यात आरोग्याशी खेळ
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. २१- उन्हाळय़ाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत आला असून यासाठी विंधन विहिरीतील पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र बहुतेक विहिरींचे पाणी क्षारयुक्त आहे. पाण्याची शुद्धता तपासणीसाठी प्रशासनाकडे नियमावलीच नसल्याने जारचे पाणी शुद्ध आहे हे तपासायचे कोणी, असा प्रश्न अन्न व औषध विभागासमोर आहे.
गत चार वर्षातील अवर्षणामुळे शुद्ध पाण्यासाठी नागरिकांचा बाटलीबंद पाण्याकडे ओढा वाढला आहे. जिल्ह्यात दहा लिटर पाण्याची जार ३0 ते ३५ रुपयांना विकली जाते. या पाण्याचा पुरवठा करणार्यासाठी शहरात अनेक ठिकाणी दुकाने थाटली आहेत. मात्र या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह कायम आहेत. यामध्ये विहिरीचे पाणी वापरण्यात येते. या जारबंद पाण्यातील टिडीएस (क्षार तपासणी यंत्र) तपसणी करण्यात आली असता क्षारचे प्रमाण ५६0 पीपीएम (पार्ट पर मिलीयन) निघाले. दरम्यान, पाण्याची शुद्धता तपासून कारवाई करण्याच्यादृष्टिने प्रशासकीय विभागाकडे कोणती नियमावली नसल्याने या प्रकाराला पायाबंद घालणे अवघड झाले आहे.
जारद्वारे पाणी विक्रीबाबत कोणतीच शासकीय नियमावली नसल्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.
- अनिल माहुरे, अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा.