दुस-या दिवशीही बुलडोजर
By Admin | Updated: December 10, 2014 00:13 IST2014-12-10T00:13:15+5:302014-12-10T00:13:15+5:30
शेगाव शहरातील मुख्य मार्ग अतिक्रमणमुक्त .

दुस-या दिवशीही बुलडोजर
शेगाव (बुलडाणा) : नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शेगाव शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या दिलेल्या आदेशानंतर आज मंगळवारी दुसर्या दिवशीही अतिक्रमीत जागांवर नॉन स्टॉप बुलडोजर चालला. यामुळे सायंकाळपर्यंंंत शहरातील मुख्य मार्ग अतिक्रमण मुक्त झाले आहे.
शहरातील विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांवर व्यावसायिकांकडून वेळोवेळी अतिक्रमणे केल्या जातात. शेगाव नगर पालिकेने यासाठी अनेकवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्या नंतरही दुसर्या दिवशी स्थिती जैसे थे होत असल्याची बाब नागपूर उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने याबाबत शेगाव नगर पालिकेची कानउघाडणी करीत शहरातील रेल्वे स्थानक ते श्री ग.म. मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ पोलीस बंदोबस्तात काढण्याचे आदेश ३ डिसेंबर रोजी पारित करुन एका आठवड्यात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कालपासून येथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली. सदर मोहीम काल राबविण्यात आल्यानंतर आज दुसर्या दिवशीही शहरातील उर्वरित अतिक्रमणांवर बुलडोजर चालले. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते श्री ग.म.मंदिर प्रवेशद्वारपर्यंंंतचे मार्गावरील अतिक्रमण तोडण्यात आले. यामध्ये अतिक्रमण करुन असलेली पक्की बांधकाम केलेली दुकाने व घरही तोडण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाने अतिरीक्त कुमक बोलाविली होती.
ही मोहीम नगर पालिका, महसूल प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमिअभिलेख कार्यालय यांनी संयुक्तरित्या राबवून अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमिनदोस्त करण्यात आले.