बुलडाण्याला वादळी वा-याचा तडाखा
By Admin | Updated: October 19, 2014 00:08 IST2014-10-19T00:02:21+5:302014-10-19T00:08:40+5:30
बुलडाण्यात वादळी वा-याचे थैमान; झाडेही उन्मळून पडली; जीवित हानी नाही.

बुलडाण्याला वादळी वा-याचा तडाखा
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील पिंप्रीगवळी येथे काल वादळीवार्याचा तडाखा बसल्यानंतर शनिवारी दुपारी १ वाजता बुलडाण्यात वादळीवार्याचे थैमान शहरवासीयांनी अनुभवले. तब्बल एक तास सोसाट्याच्या वार्यासह कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक मार्गांवरील झाडे पडली. शासकीय कार्यालय परिसरातील झाडेही उन्मळून पडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
दुपारी १ वाजता आलेल्या पावसाने तहसील कार्यालय, न्यायालय परिसर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेली झाडे पडली. अनेक घरांच्या खिडक्यांची तावदाणेसुद्धा तुटली. साधारण: दोन वाजेच्या सुमारास पाऊस बंद झाला व अवघ्या काही क्षणात पुन्हा उन्ह पडले. एक तासाच्या पावसामुळे शहरातील जनजिवन विस्कळीत झाले होते. दिवाळीच्या बाजारासाठी रस्त्यावर तसेच फुटपाथवर दुकान मांडून बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे काही व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे काही ठिकाणी विजेचे खांब वाकून तारा तुटल्या होत्या.
*मेहकरात मुसळधार पाऊस
मेहकर परिसरात गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारला दु पारच्या दरम्यान शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोयाबीन सोंगणीच्या हंगामात अचानक आलेल्या या अकाली पावसामुळे शेतकर्यांनी ताडपत्री, मेनकापड खरेदी करण्यास शहरातील दुकानांमध्ये गर्दी केली होती. मुसळधार पावसाने सोयाबीन सोंगणीला व्यत्यय आणला; परंतु हा पाऊस कपाशी व तूर पिकासाठी संजीवनी ठरत आहे.