बुलडाणा मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने रंगत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 04:13 PM2019-10-06T16:13:00+5:302019-10-06T16:13:23+5:30

वंचित बहुजन आघाडीने वेगळ्या उमेदवाराला घेऊन एंट्री मारल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.

Bulldana constituency changes candidate at the time! | बुलडाणा मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने रंगत!

बुलडाणा मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने रंगत!

Next

- योगेश देऊळकार  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना उमेदवारी दिली. याआधी ते अपक्ष लढण्याची चर्चा होती. परंतु वंचित बहुजन आघाडीने वेगळ्या उमेदवाराला घेऊन एंट्री मारल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आता सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ रिंंगणात आहेत. शिवसेनेकडून संजय गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. मतदारसंघ भाजपच्या वाट्याला न आल्याने योगेंद्र गोडे यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना पक्षाने उमेदवारीसाठी नाकारले. यामुळे गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते बंडाचे हत्यार हाती घेण्याच्या तयारीत होते. सुरूवातीला ते अपक्ष लढणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच्या दिवशी ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करून वंचितमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानुसार त्यांनी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी एक बैठक घेऊन शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतल्याचे जाहीर करण्यात आले व उमेदवारी अर्जही दाखल केला.
विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक रिंंगणात उडी घेतल्याने प्रारंभी तिरंगी वाटणारी ही लढत चौरंगी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. युतीच्या अधिकृत उमेदवारासह गत वेळीच्या विधानसभा निवडणुकीचेच उमेदवार सध्या रिंंगणात असले तरी त्यातुलनेत आता परिस्थिती भिन्न आहे. युतीचेच दोन बंडखोर उमेदवार आता निवडणूक लढणार असल्याने युतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवसांचा अवधी आहे. प्रत्यक्ष लढतीचे चित्र तेव्हाच स्पष्ट होईल. परंतू सध्यातरी येथे चौरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.
उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो त्याला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची साथ महत्त्वाची असते. मात्र उमेदवारांच्या पक्ष बदलाने त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहेत. कोणाची साथ द्यायची आणि कोणाला नाकारायचे हे ठरविताना त्यांची आता चांगलीच कसोटी लागताना दिसून येत आहे.


काळेंच्या पदरी निराशा
सुरूवातीला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी मोताळा तालुक्यातील तेजल काळे यांचे नाव समोर करण्यात आले होते. मात्र वेळेवर त्यांना पक्षाने ‘नारळ’ देण्यात आला असून त्यांच्या जागी शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना संधी देण्यात आल्याने त्यांच्या पदरात मात्र निराशा पडली असल्याचे बोलल्या जात आहे.


एआयएमआयएमच्या उमेदवारावरही नजरा
लोकसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयएम वंचित बहुजन आघाडीमध्ये समाविष्ट होते. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात त्यांनी उमेदवारही दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात झालेल्या मतभेदाच्या कारणावरून एआएमआयएमने विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एआयएमआयएमने वंचित बहुजन आघाडीमधूनच आयात केलेल्या मोहम्मद सज्जाद यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यामुळे होणारे मतविभाजन हे कोणाच्या पथ्यावर पडणारे आहे हे येणारा काळच स्पष्ट करेल. मात्र त्यासाठी किमान सात आॅक्टोबर या अर्जमागे घेण्याच्या तारखेची वाट पहावी लागणार आहे.

Web Title: Bulldana constituency changes candidate at the time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.