बुलडाणा जिल्ह्याला राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार
By Admin | Updated: November 30, 2014 23:20 IST2014-11-30T23:20:34+5:302014-11-30T23:20:34+5:30
एड्स नियंत्रण कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य, मुबंई येथे दिला जाणार पुरस्कार.

बुलडाणा जिल्ह्याला राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार
बुलडाणा : एड्स नियंत्रण कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल बुलडाणा जिल्ह्याला राज्यस्तरीय व्दितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार १ डिसेंबर २0१४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे देण्यात येणार आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचा देशपातळीवर नावलैकीक वाढला आहे.
अनैसर्गिक शारीरिक संबंध, एचआयव्ही रक्त असणार्या व्यक्तींशी संबंध किंवा अन्य कारणामुळे एचआयव्ही पॉझीटीव्ह व्यक्तींची संख्या वाढत आहे. या एचआयव्ही म्हणजे एड्स निर्मूलनासाठी शासनाने एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे एचआयव्हीग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. या कार्यक्रमातंर्गंत गेल्या एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या सात महिन्याच्या काळात बुलडाणा जिल्ह्यातील ३0 हजार ४६९ सामान्य व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७६ व्यक्ती एचआयव्ही पॉझीटीव्ह आढळून आल्या. तर ३७ हजार ८७ गरोदर मातांची तपासणी केली असता १३ माता एचआयव्ही पॉझीटीव्ह आढळल्या.
त्यामुळे एचआयव्ही विषयी समाजात जनजागृती व्हावी, एचआयव्ही ग्रस्तांना दिलासा मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेव्दारे विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते. या कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल बुलडाणा जिल्ह्याला राज्यस्तरीय व्दितीय पुरस्काराने १ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी अमरावती जिल्ह्याला प्रथम तर भंडारा जिल्ह्याला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.