डिजिटल साक्षरतेत बुलडाणा जिल्हा माघारला!
By Admin | Updated: February 19, 2016 01:33 IST2016-02-19T01:33:45+5:302016-02-19T01:33:45+5:30
शासनाद्वारे रजिस्ट्रेशन बंद; त्यामुळे अनेकांना फटका, अभियानावर प्रश्नचिन्ह.

डिजिटल साक्षरतेत बुलडाणा जिल्हा माघारला!
गिरीश राऊत / खामगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर करण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान (दिशा) सुरू केले आहे. या अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील ५४ लाख नागरिकांना डिजिटल साक्षर करण्याचे लक्ष्य असून, राज्याला ६0 हजार नागरिकांना साक्षर करण्याचे लक्ष्य आहे; मात्र यासाठी नोंदणीमध्ये असमानता दिसून येत असून, यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यातील नोंदणी १0 हजाराच्या वर तर काही जिल्ह्यांतील नोंदणी ३ ते ४ हजारावरच थांबली आहे.
आता वेबसाईट बंद झाल्याने याचा फटका बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना बसत असून, जिल्ह्यात आतापर्यंंंत फक्त ४ हजार ९७७ नागरिकांचीच या प्रशिक्षणासाठी नोंदणी झाली आहे. डिजिटल साक्षर अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकांना संगणक साक्षर करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासाठी देशातील १८७२ सहयोगी कंपनीद्वारे ४८ लाख ८४ हजार ८७ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी ३६ लाख ४१ हजार २३७ नागरिक डिजिटल साक्षर झाले असून, यापैकी १४ लाख ३५ हजार ४८६ जणांना डिजिटल साक्षरतेबाबत प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यासाठी या पहिल्या टप्प्यात फक्त ६0 हजार नागरिकांना साक्षरतेचे लक्ष्य देण्यात आले होते. यामधून २५ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील केवळ ४ हजार ९७७ नागरिकांची नोंदणी झाली असून, नोंदणी होणारी वेबसाईट बंद झाली आहे. यामुळे या अभियानाच्या सफलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वस्त धान्य दुकानदार अशा एकूण ५२.५ नागरिकांना दोन टप्प्यात प्रशिक्षित केल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १0 लाख लाभार्थिंना या योजनेंतर्गत प्रशिक्षित केल्या जात आहे. यामध्ये ६.३ लाख लाभार्थिंना १ स्तराचे प्रशिक्षणासाठी तर २.७ लाख लाभार्थिंना स्तर २ चे तर ९ लाख लाभार्थिंना शासनाकडून प्रशिक्षण शुल्क सहायतेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर १ लाख लाभार्थिंना उद्योजक व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्या जाणार आहे. दुसर्या टप्प्यात ४२.५ लाख नागरिकांना प्रशिक्षित केल्या जाणार आहे.