शेगाव (जि. बुलढाणा) : शेगाव तालुक्यात काही गावांत तीन महिन्यांपूर्वी केस गळतीची लागण झाली होती. याच परिसरात आता ‘नखगळती’ची नवी समस्या समोर आली आहे. मागील सहा दिवसांपासून पाच गावांमध्ये या लक्षणांचे ४६ रुग्ण आढळले आहेत. बोंडगाव - १४, कालवड - १३, कठोरा - १०, मच्छिंद्रखेड - ७ आणि घुई - २, अशा पाच गावांत ही लक्षणे आढळली आहेत.
या घटनेची माहिती समोर येताच आरोग्य विभागाने तातडीने वरील गावांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रर यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारामागे दूषित पाणी व पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचा संशय आहे.
मागील अहवालाची प्रतीक्षा
केसगळती प्रकरणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पथकाने प्रभावित गावांमध्ये तपासण्या केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत अहवाल जाहीर झालेला नाही.
सेलेनियमचे प्रमाण अधिक?
खारपाणपट्ट्यातील काही भागांतील जमिनीत सेलेनियमचे प्रमाण अधिक असून, झिंकच्या प्रमाणात घट झाल्यामुळे केस व नख गळतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हात व पायांची नखे पोकळ होऊन गळून पडतात, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केला जात आहे. घाबरण्याचे काहीही कारण नाही. -डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा साथरोग अधिकारी, बुलढाणा