बुलडाणा जि.प. अधिका-यांना धरले धारेवर
By Admin | Updated: February 5, 2015 01:46 IST2015-02-04T01:28:12+5:302015-02-05T01:46:09+5:30
मलकापूर, नांदुरा तालुक्याची आढावा बैठक, रक्षा खडसे आक्रमक.

बुलडाणा जि.प. अधिका-यांना धरले धारेवर
बुलडाणा : रावेर मतदारसंघांतर्गत येणार्या मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलची आढावा बैठक खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आज दि. ३ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी अधिकार्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने खासदार खडसे यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात आज मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या शिक्षण, पाणी, आरोग्य व ग्रामीण विकासाबाबत खा. रक्षा खडसे यांनी आढावा घेतला. यावेळी अनेक अधिकार्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीस उपस्थित अधिकार्यांनी उत्तरे न दिल्यामुळे यांनी कानउघाडणी केली. यावेळी त्यांनी गावात तलाठी, ग्रामसेवक यांना आपल्या वेळेत उपस्थित राहून जनतेची कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले. ज्या अधिकार्यांकडे जास्त गावाचा प्रभार आहे, त्यांनी संबंधित गावातील उपस्थितीचा वार ठरवून त्याची माहिती गावकर्यांना द्यावी, आपल्या मुख्यालयी जनतेला बोलावून आर्थिक भुर्दंड देऊ नये, अशा शब्दात त्यांनी सुनावले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रकल्प अधिकारी अनुप शेनगुलवार, अतिरिक्त मुकाअ हजारे, नांदुरा सभापती अनिल इंगळे, योगेंद्र गोडे, भाजप महिला आघाडीच्या वैशाली डाबेराव, एकनाथ खर्चे आदी उपस्थित होते.