बुलडाणा : हगणदरीमुक्तीसाठी अनोखी शक्कल; शौचालय नसल्यास धान्य पुरवठा होणार बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:50 IST2017-12-25T00:50:11+5:302017-12-25T00:50:29+5:30
डोणगाव : गाव हगणदरीमुक्त व्हावे, यासाठी डोणगावमध्ये अनोखी शक्कल लढविण्यात आली असून, शौचालय नसलेल्या ग्रामस्थाला धान्य न देण्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीने गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे.

बुलडाणा : हगणदरीमुक्तीसाठी अनोखी शक्कल; शौचालय नसल्यास धान्य पुरवठा होणार बंद!
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : गाव हगणदरीमुक्त व्हावे, यासाठी डोणगावमध्ये अनोखी शक्कल लढविण्यात आली असून, शौचालय नसलेल्या ग्रामस्थाला धान्य न देण्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीने गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे. दरम्यान, त्यानुषंगाने गावात दवंडीही देण्यात आली आहे. परिणामी हा विषय सध्या गावात चर्चेचा विषय बनला आहे.
मेहकर तालुक्यातील डोणगाव हे एक मोठे गाव आहे. या गावास राजकीय तथा व्यापारी दृष्टिकोणातून मोठा इतिहास आहे; मात्र गाव हगणदरीमुक्त होण्यात सध्या अडचण आली आहे. गावातील जवळपास १२00 नागरिकांकडे शौचालय नसल्याने स्वच्छ भारत मिशनची कामे येथे अडचणीत आली आहे. वैयक्तिक शौचालयासाठी शासनस्तरावरून अनुदान देण्यात येत असले तरी गावात अनेकांनी शौचालय बांधलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी शौचालय निर्मितीसाठी प्रेरित व्हावे, या दृष्टिकोणातून हा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. डोणगाव ग्रामपंचायतीने डोणगावातील राशन दुकानदारांना ज्यांच्याकडे शौचालय नाहीत, अशा लोकांची यादी दिली असून, यांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, असे स्पष्ट केले आहे.
प्रकरणी जानेवारी महिन्यापासून जोपर्यंत शौचालय असल्याचे प्रमाणपत्र सदर व्यक्ती आणणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचे राशन बंद करावे, असे पत्रात नमूद केले असून, तशा प्रकारची दवंडीही २३ डिसेंबरला संपूर्ण गावात देण्यात आली आहे. दुसरीकडे शौचालयासाठी असणारे अनुदान कमी असल्याने व अनेकांजवळ हक्काची जागा नसल्यामुळे त्यांनी शौचालय बांधावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शौचालय बांधकामासाठी रेती, पाणी कुठून आणावे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वांनी शौचालय बांधकाम करावे, म्हणून शासनाच्या आदेशानुसार राशन दुकानदारांना पत्र देण्यात आले असून, यातून गाव हगणदरीमुक्त व्हावे, हा उद्देश आहे.
- डी. टी. तांबारे, ग्रामविकास अधिकारी डोणगाव