दुष्काळी जिल्ह्यांतून बुलडाणा वगळला
By Admin | Updated: October 17, 2015 01:50 IST2015-10-17T01:50:40+5:302015-10-17T01:50:40+5:30
नजर आणेवारी दाखवली ५९ पैसे; शेतकरी आर्थिक संकटात.

दुष्काळी जिल्ह्यांतून बुलडाणा वगळला
बुलडाणा: ५0 टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे; मात्र यामध्ये जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नाही. जिल्ह्यात नजर आणेवारी ५९ पैसे असली तरी दुष्काळाचे सावट सर्वत्र असून, उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. घाटावर व घाटाखाली अशा दोन भागात विभागलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कपाशीवर मात करून सोयाबीनचे क्षेत्र वाढले; मात्र यावर्षी पेरणीच्या सुरुवातीला पावसाने दगा दिल्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे दुबार पेरणी केलेल्या पिकांना पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी उत्पादनावर परिणाम झाला. एकूण जिल्ह्यातील जवळपास ५0 टक्के उत्पादनात घट आली आहे. काही शेतकर्यांचा शेतीला लावण्यात आलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेतही वाढ होत आहे; मात्र शुक्रवारी शासनाने घोषित केलेल्या दुष्काळी गावामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश करण्यात न आल्यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र निराशा निर्माण झाली आहे. नजर आणेवारी ५९ पैसे असली तरी अंतिम आणेवारी ही ५0 टक्क्यांपेक्षा खाली येणे अपेक्षित असल्याने शासन याबाबत सुधारित निर्णय घेते का, याकडेही लक्ष लागले आहे.