In Buldana district, the cure rate of Corona patients increased by 4% | बुलडाणा जिल्ह्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले

बुलडाणा जिल्ह्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात १२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू व तब्बल २९ हजार ७९४ जण कोरोना बाधित आढळून आल्याने कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात आणखी वेगाने वाढते की काय अशी भीती वाटत असतानाच गेल्या दीड महिन्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढल्याचे दिलासादायक वृत्त आहे. अद्याप यापूर्वीचे महत्तमस्तर असे ९६ टक्के प्रमाण अद्याप जिल्ह्याने गाठलेले नसले तरी ८४ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यावर आले आहे ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागले. विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात महत्तमस्तरावर अशा १ लाख ७७ हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.  विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यात १७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट जिल्ह्यात कायम होता. तोही आता येत्या काळात घटण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. सध्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट १४ टक्क्यांवर स्थिरावला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एकंदरीत बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात १ लाख ६४ हजार संदिग्धांच्या जिल्ह्यात कोरोना चाचण्या झाल्या होता. त्या तुलनेत गेल्या दीड महिन्यात विक्रमी अशा १ लाख ७७ हजार संदिग्धांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याअखेर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८४ टक्क्यांवर घसरले होते. ते एप्रिल महिन्याच्या मध्यावर ४ टक्क्यांनी वाढून ८८ टक्के झाले आहे. त्यावरून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा डाऊनफॉल सुरू झाला की काय असा कयासही व्यक्त केला जात आहे.
त्यातच १५ दिवसाच्या संचारबंदी व कडक निर्बंधाचा फायदाही जिल्ह्यातील काेराेना संक्रमणाची गती कमी हाेण्यास मिळेल. त्याची फक्त प्रभावी अंमलबजावणी हाेण्याची गरज आहे. 


मृत्युदरही घसरला
वरकरणी बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी मार्च महिन्याच्या प्रारंभी बुलडाणा जिल्ह्याचा मृत्युदर हा १.०४ टक्के होता तो १४ एप्रिल रोजी ०.६४ टक्क्यांवर आला आहे. हीपण जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणावी लागले.

Web Title: In Buldana district, the cure rate of Corona patients increased by 4%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.