In Buldana district, the cure rate of corona patients is 59 percent | बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नववर्षाचे दोन महिने संपुष्टात आले असून, गतवर्षीच्या कोरोना बाधितांशी तुलना करता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने घसरले असल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षी जेथे ९७ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण होते तेथे ते नववर्षात ५९ टक्क्यांवर आले आहे. परिणामी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच आता आरोग्य प्रशासनाकडून नवीन कोविड केअर सेंटरसाठी जागा शोधण्याची मोहीमच हाती घेतल्याचे चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८ हजार ६६८ असून, त्यापैकी १५ हजार ७७६ रुग्ण हे आतापर्यंत बरे झाले आहेत. आतापर्यंतचा विचार करता रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण हे ८४.५०  टक्के (प्रोग्रेसिव्ह) अर्थात ८५ टक्के आहे. मात्र, नववर्षातील कोरोना बाधितांची संख्या व त्यातुलनेत उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या याचा विचार करता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५९ टक्के आहे. 
गेल्या वर्षीच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाशी तुलना करता हे प्रमाण ३८ टक्क्यांनी घसरले असल्याचे एकंदरीत आकडेवारी सांगते. त्यामुळे जिल्ह्यातील १४ कोविड केअर सेंटर, कोविड समर्पित रुग्णालय आणि कोविड हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये सक्रिय रुग्ण वाढले आहेत. एक प्रकारे ही धोक्याची घंटा असल्याचे चित्र आहे. मात्र, कोरोना लसीकरण मोहीम सुरू असल्याने येत्या काळात कोराना बाधितांचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

Web Title: In Buldana district, the cure rate of corona patients is 59 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.