बुलडाणा शहरात सुरू झाले बॅनर युद्ध
By Admin | Updated: October 11, 2014 00:02 IST2014-10-10T23:01:32+5:302014-10-11T00:02:37+5:30
लाखोची उलाढाल : अधिकृत केवळ १00 फलक

बुलडाणा शहरात सुरू झाले बॅनर युद्ध
बुलडाणा : निवडणूक प्रचाराचा ज्वर आता चांगलाच वाढला आहे. गाड्या, पोष्टर, बॅनर्स आणि डोअर टु डोअर प्रचार चांगलाच रंगत आहे. बुलडाणा शहरात प्रमुख चौकांसह गल्लीबोळात उमेदवारांचे फ्लेक्स बोर्डचे युद्ध सुरू झाले असून, प्रशासनाकडे नोंद असलेले शहरात लहान-मोठे १00 फ्लेक्स बोर्ड लागलेले आहेत. या माध्यमातून नगरपालिकेला १ लाख ९२ हजार रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू झाला आहे. तिसर्या टप्प्यात उमेदवार साम, दाम, दंड याचा वापर करून आपलेच घोडे समोर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रचार माध्यमाचा वापर केल्या जातो. यामध्ये सर्वाधिक फ्लेक्स बोर्डचा वापर होत असून, उमेदवाराची छबी, पक्षाचे चिन्ह आणि नेत्यांच्या फोटोचा वापर त्यात केल्या जातो. बुलडाणा शहरात प्रमुख चार चौक आहेत. या चौकात प्रत्येक उमदवारांचे मोठमोठे होर्डिंग्ज लागलेले दिसतात. याशिवाय शहराच्या गल्लीबोळात बॅनर्सचे युद्ध पहावयास मिळत आहे. या बॅनर्स युद्धामध्ये सर्वात आघाडीवर भाजपचे उमेदवार योगेंद्र गोडे आहेत. गोडे यांचे शहरात तब्बल ४२ होर्डिंंग्ज लागलेले आहेत. त्या पाठोपाठ शिवसेनेचे विजयराज शिंदे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्येकी १७ तर मनसेचे संजय गायकवाड यांचे १४ होर्डिंंग्ज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ८ फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत. तर बसपाचे २ आणि अपक्ष उमेदवाराचा १ बोर्ड लागलेला आहे. या फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून नगरपालिकेला १ लाख ९२ हजार रुपये कराच्या रूपात पैसा मिळाला आहे.
*अनधिकृत बोर्डाचे काय ?
उमेदवारांनी रितसर परवानगी घेऊन शहरात लावलेल्या फ्लेक्स बोर्डची संख्या १00 असली तरी अनधिकृत बोर्डाची संख्या शहरात शेकडोनी आहे. याची नोंद ठेवणारी यंत्रणा मात्र नगरपालिकेकडे नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेनी ठरविलेले बोर्ड म्हणजेच अधिकृत आहेत, असे असेल तर पालिकेचा लाखो रूपयांचा कर बुडत आहे.