सराफा दुकानात चोरी करणा-या बुरखाधारी महिला गजाआड
By Admin | Updated: November 28, 2015 02:39 IST2015-11-28T02:39:09+5:302015-11-28T02:39:09+5:30
चिखली पोलिसांचे यश, मुद्देमालासह दोन महिला अटकेत, एक फरार.

सराफा दुकानात चोरी करणा-या बुरखाधारी महिला गजाआड
चिखली (जि. बुलडाणा) : सोन्याची अंगठी घ्यायची आहे, अशी बतावणी करीत सराफा व्यावसायिकास फूस लावून दुकानातील साडेचार लाखाचा ऐवज लंपास करणार्या तीन बुरखाधारी महिलांचा शोध घेण्यात चिखली पोलिसांना यश आले असून, या चोरी प्रकरणात नाशिक जिल्हय़ातील मालेगाव येथील समकसेर काकुबाईचा बाग या भागातील २ महिला आरोपींना अटक करण्यात आले आहे. एक महिला अद्यापही फरार असून, पोलीस तिच्या मागावर आहेत. दरम्यान, अटकेतील दोन आरोपी महिलांकडून १ लाख ३0 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंंंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. येथील विशाल आत्माराम टेहरे यांच्या सराफा दुकानात २३ ऑगस्ट रोजी विशाल टेहरे यांचे वडील गणपत टेहरे हे व त्यांचा नोकर संतोष पवार हे दोघेजण दुकानात असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुकानात तीन बुरखा घातलेल्या महिलांनी प्रवेश घेतला व त्यांनी गणपत टेहरे यांना सोन्याची अंगठी विकत घ्यावयाची असल्याचे सांगत अत्यंत शिताफीने सुमारे साडेचार लाखाचा ऐवज चोरून पसार झाल्या होत्या. दरम्यान, या गुन्हय़ातील महिलांनी बुरखा धारण केला असल्याने या चोरीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही.फुटेजचे बारकाईने अवलोकन केल्यानंतर तपासाची दिशा ठरवून संशयीत आरोपी महिलांची गुप्त माहिती घेतली. या महिला नाशिक जिल्हय़ातील मालेगाव येथील समकसेर काकुबाईचा बाग या भागात राहत असल्याचे निश्चित झाले. हा भाग पूर्णपणे झोपडपट्टीचा व मुस्लीमबहुल वस्ती असलेला संवेदनशील परिसर, त्यातच बुरखाधारी महिला आरोपींचा शोध घेणे जोखमीचे होते; मात्र ही जबाबदारी ठाणेदार राजपूत यांनी स्वत:वर घेऊन आरोपी महिलांचे वास्तव्याचे ठिकाण व त्यांच्या हालचालींवर तब्बल तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी महिला कर्मचारी सुषमा वुईके व किरण साबळे यांनी बुरखा धारण करून पाणी भरण्याच्या बहाण्याने भल्या पहाटे आरोपी महिलांच्या घरात प्रवेश करून सईदा रहेमतुल्ला अन्सारी वय ४0 वष्रे व साजीदा ऊर्फ अन्नु बशीर अन्सारी वय ३0 वष्रे या दोघींना ताब्यात घेतले. अटकेतील महिलांनी गुन्हय़ाची कबुली दिली असून, त्यांच्याकडून साडेचार लाखाच्या सोन्या-चांदीच्या ऐवजापैकी १ लाख ३0 हजाराचा ऐवज हस्तगत केला. दरम्यान, या प्रकरणातील अन्य एक महिला आरोपी अद्यापही फरार आहे. अटकेतील महिलांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने २८ नोव्हेबरपर्यंंंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात सपोनि विक्रांत पाटील, पोउपनि अशोक चाटे, पोना संदीप सुरडकर, अजय शेगोकार, राजू सोनोने, विजय सोनोने, महिला कर्मचारी किरण साबळे, सुषमा वुईके यांनी भूमिका बजावली.